‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 02:30 AM2019-07-21T02:30:47+5:302019-07-21T02:31:05+5:30
उत्तर प्रदेशातील हत्याकांड। मृत कुटुंबियांनी मिर्झापूरच्या विश्रामगृहावर घेतली प्रियांका गांधी यांची भेट
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या आदिवासी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांनी शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार येथील विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील संघर्ष मिटला.
सोनभद्र येथे बुधवारी एका गावाच्या सरपंचाने १0 गोंड आदिवासींची गोळ््या घालून हत्या केली होती. मृत आदिवासींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी या काल उत्त्तर प्रदेशात आल्या होत्या. तथापि, पोलिसांनी त्यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते. त्यांना ताब्यात घेऊन विश्रामगृहावर आणण्यात आले होते. सुटका करून घेण्यासाठी वैयक्तिक जात मुचलका सादर करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना केली होती. तथापि, प्रियांका गांधी यांनी वैयक्तिक जात मुचलका देण्यास नकार देऊन आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. प्रियांका गांधी या रात्रभर विश्रामगृहावरच मुक्कामी थांबल्या. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.
ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय राय यांनी सांगितले की, आज सकाळी मृत आदिवासींच्या परिवारातील १५ सदस्यांनी प्रियांका गांधी यांची विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. त्यात सात महिलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची विनाअट सुटका केली. त्या वाराणसी मार्गे नवी दिल्लीला परतल्या.
आदिवासींची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, ज्यांनी मला अटक करून चुनार विश्रामगृहावर आणले होते, ते आता म्हणत आहेत की, तुम्ही कोठेही जाण्यास मुक्त आहात! मी त्यांना सांगू इच्छिते की, सोनभद्र हत्याकांडातील पीडित आदिवासी परिवारांची भेट घेण्यासाठी मी आले होते. माझा हेतू सफल झाला आहे. मी आता जात आहे; पण मी परत येईन. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काल रात्री उशिरा एक टष्ट्वीट करून ‘प्रशासनाने आपणास पुढे जाऊ न दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत’, असे म्हटले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळासही पोलिसांनी वाराणसी विमानतळावर ताब्यात घेतले.
काय आहे घटना?
सोनभद्रच्या घोरवाल भागातील उभ्भा गावात हे हत्याकांड घडले आहे. गावचा सरपंच यज्ञ दत्त याने ट्रॅक्टरमध्ये गुंड आणून वादग्रस्त जमीन कसणाऱ्या आदिवासींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १0 आदिवासी ठार, तर २८ जण जखमी झाले होते. जखमींत दत्त याच्या ९ समर्थकांचाही समावेश आहे.
आदिवासींचे अश्रू पुसले
भेटायला आलेल्या आदिवासींच्या परिवारांतील सदस्यांचे प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना पाणीही दिले. काही पीडित परिवारातील सदस्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढून या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या.