नरेंद्र मोदींवरील चित्रपटांत परवानगीविना दोघा गीतकारांची वापरली गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 04:55 AM2019-03-24T04:55:24+5:302019-03-24T04:55:45+5:30
ज्यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिलेलीच नाहीत, अशा दोघांची नावे पोस्टरवर छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात चित्रपटाच्या निर्मात्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटापुढील अडचणी वाढतच चालल्या असल्याचे दिसत आहे. या चित्रपटासाठी आपण गीत लिहिले नसल्याचा खुलासा प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर आता आपले नाव गीतकार म्हणून पोस्टरवर छापल्याबद्दल गीतकार समीर यांनीही आक्षेप घेतला आहे. त्यांनीही आपण या चित्रपटासाठी गाणे लिहिलेले नाही, असे समीर यांनी स्पष्ट केले आहे.
ज्यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिलेलीच नाहीत, अशा दोघांची नावे पोस्टरवर छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात चित्रपटाच्या निर्मात्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे. जावेद अख्तर व समीर या दोन गीतकारांनी अन्य चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटांत परस्पर वापरण्यात आल्याचे त्यामुळे उघड झाले आहे.
‘१९४७ अर्थ’ चित्रपटातील ईश्वर अल्लाह हे जावेद अख्तर यांचे गीत व ‘दस’ चित्रपटातील सुनो गौर से दुनियावालो ही दोन गीते आम्ही चित्रपटांमध्ये वापरली आहेत. त्यामुळे आम्ही पोस्टरवर त्या दोघांची नावे छापली, असा खुलासा निर्मात्याने केला. पण त्यासाठी निर्मात्याने बहुधा या दोघा गीतकारांची पूर्वपरवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे गीतकार ही गाणी चित्रपटातून काढून घेण्याची मागणी करू शकतील.
प्रदर्शनास विरोध
या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंगकुमार यांनी केले आहे. याआधी त्यांनी मेरी कोम व सरबजीत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ‘पीएम नरेंद्र मोदी’ ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, त्यास द्रमुकसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे व मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तर चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास खळ्ळ्खट्याक केले जाईल, असा इशारा दिला आहे.