सोनियांना स्वतंत्र विचाराचा पंतप्रधान नको होता
By admin | Published: December 11, 2015 11:53 PM2015-12-11T23:53:27+5:302015-12-11T23:53:27+5:30
गांधी कुटुंबाला सर्वोच्च अशा पंतप्रधानपदी स्वतंत्ररीत्या निर्णय घेणारी व्यक्ती नको होती. १९९१ मध्ये १० जनपथशी जवळीक असलेल्या स्वयंघोषित निष्ठावंतांनी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पारड्यात
नवी दिल्ली : गांधी कुटुंबाला सर्वोच्च अशा पंतप्रधानपदी स्वतंत्ररीत्या निर्णय घेणारी व्यक्ती नको होती. १९९१ मध्ये १० जनपथशी जवळीक असलेल्या स्वयंघोषित निष्ठावंतांनी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पारड्यात झुकते माप टाकण्यासाठी सोनिया गांधी यांची समजूत घातली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.
सोनिया गांधींशी निष्ठा ठेवणाऱ्यांमध्ये दिवंगत ज्येष्ठ नेते अर्जुनसिंग यांचाही समावेश होता. ते स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. त्यांनी माझ्याऐवजी नरसिंहराव यांना समोर आणण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घ्यावा हे पटवून देताना नामी शक्कल शोधली होती, असा दावाही पवारांनी ‘लाईफ आॅन माय टर्म्स- फ्रॉम ग्रासरुट अॅण्ड कॉरिडॉर आॅफ पॉवर’ या पुस्तकात केला
आहे.
नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात पवार हे संरक्षणमंत्री होते. पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात गुरुवारी आयोजित समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन झाले. पवारांचा आज शनिवारी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे.
त्यावेळी पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा विचार सुरू होता. महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्येही चर्चा सुरू होती. सोनियांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथवर खूप काही निर्भर आहे याची मला जाणीव होती. पी.व्ही. नरसिंहराव हे प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडले होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नेतृत्वाची धुरा सोपविण्यासाठी दीर्घ अनुभव पाहता राव यांना पुन्हा राजकारणात आणण्याचा विचार त्यावेळी पुढे आला. पवारांचे तरुण वय पाहता गांधी कुटुंबांच्या कौटुंबिक हिताला बाधा पोहोचेल अशी चर्चा दहा जनपथच्या स्वयंघोषित निष्ठावंतांनी त्यावेळी खासगीत रंगविणे चालविले होते.
‘वो लंबी रेस का घोड़ा है’ असा त्यांचा युक्तिवाद होता. धूर्त चाल खेळणाऱ्यांमध्ये अर्जुनसिंग यांच्यासोबतच माखनलाल फोतेदार, आर.के. धवन,व्ही. जॉर्ज आदींचा समावेश होता. राव हे वयस्क असून त्यांची प्रकृतीही साथ देत नसल्यामुळे त्यांच्याकडे पंतप्रधानपद सोपविणे सुरक्षित राहील अशा प्रकारे त्यांनी सोनियांची समजूत घातली. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या अर्जुनसिंगांना लवकरच आपल्याकडे पद सोपविले जाईल, अशी आशा होती.
राव यांना परत आणण्याची कल्पना वरचढ ठरल्यानंतर ती लाट माझ्याविरोधात गेली, असेही पवारांनी नमूद केले आहे.
। आणि नरसिंहराव पंतप्रधान बनले...
आकस्मिकरीत्या राव यांनी पवारांवर ३५ मतांनी मात केली. इंदिरा गांधी यांचे माजी प्रधान सचिव पी.सी. अलेक्झांडर हे गांधी कुटुंबाचे खास विश्वासू मानले जात. त्यांनी माझ्याकडे सर्वोच्च तीन खात्यांचा प्रस्ताव ठेवला होता.
मी सशक्त दावेदार असलो तरी गांधी कुटुंबाला स्वतंत्ररीत्या निर्णय घेणारी व्यक्ती नको होती हे अलेक्झांडर आणि मला माहीत होते.
>१९९७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कसे पडले याचा किस्सा पवारांनी वेगळ्या प्रकरणात सांगितला आहे. त्यावेळी पवार लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. आपल्या मागण्या मान्य न केल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी अण्णाद्रमुकच्या १८ खासदारांचे समर्थन काढून घेतले होते. काँग्रेसने वाजपेयींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. ध्वनिमताने हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर विरोधकांनी मतदानाची मागणी केल्यामुळे तत्कालीन अध्यक्षांनी मतदान घेतले.
सरकारविरुद्ध कुणी मतदान केले याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. काहींनी मला मायावतींशी बोलताना बघितले होते. त्यांनी मला त्याविषयी वारंवार विचारणा चालविली होती. मी त्याबद्दल मौन पाळले.
संसदेतल्या कर्मचाऱ्यांनी दारे बंद करीत व्होटिंग मशीनवर मतदानाची प्रक्रिया सुरू केली, त्या अवघ्या काही मिनिटांत मी बसपाच्या प्रमुख मायावती यांना बाजूला नेत काही शब्द बोललो. बसपाकडे पाच खासदार होते. हा पक्ष कोणती भूमिका घेणार याचे गुपित कायम होते. व्होटिंग मशीनने आकडा दाखविला त्यावेळी वाजपेयी सरकार एका मताने पराभूत झाले होते.
एवढ्या वर्षांनंतरही मला मायावतींशी काय बोलणे झाले याबाबत विचारले जाते. मी मायावतींना एवढेच म्हणालो होतो की, तुम्ही वाजपेयी सरकारविरुद्ध मतदान केल्यास उत्तर प्रदेशात तुमच्या पक्षाला चांगले यश मिळेल. मायावतींना ते पटले होते. अखेरच्या क्षणी बसपाने सरकारविरुद्ध मतदानाचा निर्णय घेतला आणि वाजपेयी सरकार गडगडले, असा खुलासाही पवारांनी विस्ताराने केला आहे.
पक्ष चालविण्यासाठी सोनिया गांधी केवळ दोन- तीन लोकांवर अवलंबून होत्या. काँग्रेसने महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त जागा जिंकल्यामुुळे पक्षात थोडीफार अस्वस्थता होती.
१९७८ मध्ये इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध बंड पुकारत पुलोदचे सरकार स्थापन केल्याकडे निष्ठावंतांनी सोनियांचे लक्ष वेधले होते. मी १९९० मध्ये मुख्यमंत्री असताना माझ्याविरोधात काही मंत्र्यांनी केलेले बंड फसले होते. राजीव गांधी हेही माझ्याविरुद्ध होते, अशा बाबी सोनिया गांधी यांच्या कानावर घालत निष्ठावंतांनी अपेक्षित प्रभाव साधला होता.