सोनिया, प्रियांका गांधींची सुरक्षा यापुढे महिलांच्या हाती; १० आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:33 AM2021-12-23T06:33:10+5:302021-12-23T06:34:08+5:30
अतिमहत्त्वाच्या महिलांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफमधील महिलांना नेमावे, असा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना यापुढे केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे वृत्त आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनाही महिलांद्वारे सुरक्षा पुरवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
अतिमहत्त्वाच्या महिलांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफमधील महिलांना नेमावे, असा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार सोनिया गांधी, प्रियांका गांधी व गुरुशरण कौर यांच्या सुरक्षेतसाठी महिला अधिकारी पाठवण्यात येतील, असे समजते. अर्थात याची अमलबजावणी होण्यास अवधी लागणार आहे, कारण यासाठी महिलांची निवड अद्याप करण्यात आलेली नाही.
पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत महिलांचा समावेश करण्यात येईल. माजी पंतप्रधानांच्या पत्नी गुरुशरण कौर या थेट राजकारणात वा प्रचारात नसल्या तरी त्यांनाही त्याच वेळी महिला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल.
विशेष प्रशिक्षण
सीआरपीएफमधील ३३ महिलांना अतिमहत्त्वाच्या महिलांच्या सुरक्षेसाठीचे १० आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सीआरपीएफमध्ये महिलांच्या १० पलटणी तयार करण्याचे ठरले आहे.