खुद्द सोनियाही नितीन गडकरींच्या कामाचं बाकं वाजवून कौतुक करतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:12 PM2019-02-07T16:12:36+5:302019-02-07T16:35:32+5:30
नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. लोकसभेत गडकरींच्या कामाची वाहवा करताना सोनिया यांनी चक्क बाकं वाजवून गडकरींच्या कार्याला दाद दिली. लोकसभेत गडकरींकडे असलेल्या खात्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरील, उत्तरादरम्यान खासदार सिंग यांच्या 'वंडरफुल्ल' शब्दाचा उल्लेख येताच सोनिया गांधींनी दाद देत गडकरींचे कौतुक केलं.
नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे, लोकसभेत रस्ते मंत्रालयाकडून झालेल्या कामासंदर्भात आणि देशात सुरू असलेल्या कामासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना गडकरींना देशातील सर्वच खासदार माझ्या आणि माझ्या मंत्रालयातील कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले. या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात सध्या रस्तेबांधणीचे कामे सुरू असल्याचेही गडकरींनी सांगितले. त्यावेळी, भाजपा खासदारांनी गडकरींच्या उत्तराने समाधान व्यक्त करत लोकसभेत बेंच वाजवून त्यांना समर्थन दिले.
मध्य प्रदेशचे भाजपा खासदार गणेश सिंग यांनीही यावेळी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. केंद्रीय दळणवळणमंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाकडून 'वंडरफुल' काम सुरू असल्याचं सिंग यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना म्हटले. त्यावेळी, हे सर्व बारकाईने ऐकणाऱ्या खासदार सोनिया गांधी यांनी हळूवार स्माईल देत बाक वाजवून गडकरींच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनिया गांधीचे अनुकरण करत गडकरींच्या कामाचे बाक वाजवून कौतुक केले.
दरम्यान, सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांच्या समस्येबाबत नितीन गडकरींना लक्ष घालण्याचे सूचवले होते. त्यानंतर, रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लावल्याबद्दल नितीन गडकरींना पत्र लिहून सोनिया गांधींनी आभार व्यक्त केले होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हे पत्र सोनिया यांनी लिहिले होते.