Sonia Gandhi : हा वाद बालिशपणाचा, उद्धव ठाकरेंच्या फोननंतर सोनिया गांधींचं मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:04 PM2021-04-17T17:04:22+5:302021-04-17T17:14:44+5:30
सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये देशातील विविध राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर, सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिले आहे
नवी दिल्ली - कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र, जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तर, दुसरीकडे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही सूचना केल्या आहेत. तसेच, केंद्र आणि राज्य यांमधील वाद बालिशपणाचा असून भाजपाच्या काही केंद्रीय मंत्र्यांनाही सोनिया गांधींनी टोला लगावला आहे.
सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये देशातील विविध राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर, सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिले आहे. कोरोना कालावधीही केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांकडून जो भेदभाव होत आहे, त्यावरुन सोनिय गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या वादावरुनही त्यांनी काही मंत्र्यांच्या वर्तणुकीला लक्ष्य केलंय. कोरोना महामारीच्या संकटातही काँग्रेस शासित राज्यांसमवेत भेदभाव केला जात आहे. तर, काँग्रेस विरोधी राज्यांना प्राथमिकता देऊन मदत करण्यात येत असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.
सोनिया गांधींनी आपल्या पत्रात केंद्र सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, 25 पेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लस देण्यात यावी. केंद्र सरकारने कोविड संबंधित गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी माफ करावा. त्यामुळे, या परिस्थितीत राज्यांना ते साहित्य सहज खरेदी करता येईल. तसेच, लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरिबांना 6 हजार रुपये थेट बँक खात्यात द्यावेत, अशा अनेक सूचना सोनिया यांनी केल्या आहेत.
India’s first case of COVID-19 was detected on 30-01-20. India’s first vaccine shot was administered on 16-01-21. Between the two dates, and thereafter, there is a saga of tragedy, incompetence and colossal mismanagement.
— Congress (@INCIndia) April 17, 2021
- Statement after meeting of Congress Working Committee pic.twitter.com/a0d7Od9mQA
देशातील अनेक राज्यात ऑक्सिजन, बेड आणि वेंटेलेटरसह औषधांची करतरता आहे. मात्र, अशा काळातही काँग्रेस व मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष केले जात असून भाजपाशाषित मुख्यमंत्र्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रांना उत्तर मिळत नाही, असा आरोपही सोनिया यांनी पत्रातून केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला होता, मात्र मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप नेतेही गांभीर्याने घेत नाहीत - नाना पटोले
कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात विरोधी पक्षांसह अनेक तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे मोदी सरकारने डोळेझाक करून आपले राजकीय अज्ञान उघड केले आहे. राज्यातील भाजप नेतेही कोणालाच गांभीर्याने घेत नाही अशी विधाने करून या महामारीच्या काळात हीन राजकारण करत आहेत. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सतत विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू रहावे यासाठी त्यांची धडपड सुरु असून भाजपाचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
नाना पटोलेंचीही मोदींवर टीका
१२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. आता एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्याची फळे देशातील गरीब जनता भोगते आहे, असे टीकास्त्र पटोले यांनी सोडले.