'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:32 PM2019-10-02T13:32:29+5:302019-10-02T13:33:10+5:30
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर स्तुतिसुमनं उधळत त्यांनी भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज सर्वांसाठीच एक ऐतिहासिक दिवस आहे. 150 वर्षांपूर्वी महात्मा गांधींसारख्या महापुरुषाचा या धरतीवर जन्म झाला. गांधीजींचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या मार्गवरून चालणं अवघड असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
मागील पाच वर्षांत जे झालं ते आता पाहिलं असतं तर बापूसुद्धा दुःखी झाले असते, देशासमोर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, महिलादेखील देशात सुरक्षित नाहीत. गेल्या काही वर्षांपासून साम-दाम-दंड-भेदचा वापर करून ते स्वतःला फार ताकदवान समजतात. स्वतःच्या सत्तेच्या नशेत धुंद असलेल्यांना गांधीजींच्या निस्वार्थी सेवेचं मूल्य काय समजणार आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण महात्मा गांधींच्या ऐवजी RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहत आहेत. परंतु हे शक्य नाही.
आमच्या देशाचा पाया गांधीजींच्या विचारावर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या विचारांना छेद देऊन स्वतःच्या मार्गानं चालणारे याआधीही बरेच होऊन गेले. तरीही भारत कधीही भरकटला नाही. कारण आपला देशच गांधी विचारांच्या आधारवर उभा आहे. काही जण गांधी विचारांच्या विपरीत वागण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक असत्याचा आधार घेऊनच राजकारण करत आलेत, त्यांना गांधीजी सत्याचे पुजारी होते हे कसं समजणार. ज्यांची सत्तेसाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे, त्यांना गांधीजींच्या अहिंसेचं महत्त्व कसं काय कळणार आहे.