गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:55 AM2020-02-27T02:55:09+5:302020-02-27T07:02:25+5:30

हिंसाचाराला केंद्र, ‘आप’ सरकार जबाबदार

Sonia Gandhi on Delhi violence Amit Shah should resign | गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील जातीय हिंसाचाराला केंद्रातील आणि अरविंद केजरीवाल यांचे सरकार जबाबदार असून, या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केली.

काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीतील हिंसाचारामागे कट-कारस्थान आहे. या कटाचा अनुभव दिल्लीतील निवडणुकीत आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचारात भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या भाषणांतूनच आला होता.

दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शांतता राखण्यात अपयशी ठरले आहेत.’’ कार्यकारिणी समितीच्या बैठकीने राजधानीतील परिस्थिती ही गंभीर असून, तातडीने कारवाईची गरज असल्याचा ठराव संमत केला.

मोर्चा लांबणीवर
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रपती भवनवर काढण्यात येणारा आपला मोर्चा गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकला आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

उच्चस्तरीय चौकशी करा-मायावती
लखनौ : दिल्लीतील हिंसाचाराचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी निषेध करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली व केंद्र सरकारने हा हिंसाचार गांभीर्याने घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे, असे मायावती यांनी हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले.

दंगलीवर राजकारण करू नका; जावडेकरांचे काँग्रेसला प्रत्युत्तर
दंगल कुणी भडकवली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जाहीर वक्तव्यामुळेच दंगल भडकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्षांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे. याक्षणी राजकारण नको. पोलिसांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते, अशी टीका जावडेकर यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्रालयाने प्रयत्न केले. अमित शहा यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते त्यात होते. सध्या काँग्रेसकडे कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे घाणेरडे राजकारण सुरू आहे.

दिल्लीतील परिस्थितीवर युनोचे बारकाईने लक्ष
संयुक्त राष्ट्रे : नवी दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेज यांचे बारकाईने लक्ष असून, आंदोलकांना शांतपणे निदर्शने करू दिली पाहिजेत व सुरक्षा दलांनी संयम पाळला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला, असे गुटेरेज यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारेक यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यावरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबलसह २० जण ठार तर १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे लक्ष आहे का, असे विचारले असता दुजारेक म्हणाले, ‘‘आम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’

ईशान्य दिल्लीत लष्कर तैनात करा- संजय सिंह
हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे लष्कराला तैनात करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि गोपाल राय यांनी बुधवारी येथे सरकारला केले.
वार्ताहरांशी बोलताना सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वारंवार मागणी करूनही सीमा भाग बंद का केले गेले नाहीत?. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘आप’ सरकार सर्व काही करीत असल्याचा दावा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे केवळ औपचारिकतेसाठी बैठका घेऊ शकत नाहीत.
‘गृहमंत्री जागे व्हा, एक उपचार म्हणून तुम्ही बैठका बोलावत आहात आणि तुमच्या पक्षाचे लोक काय करीत आहेत? ते तर हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. उपचार म्हणून बैठका घेतल्यामुळे काहीही साध्य होणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.
हिंसाचाराला चिथावणी देणाºया लोकांना कोणताही धर्म नाही. मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक दिल्लीत हिंसाचाराला चिथावणी देण्यास येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Sonia Gandhi on Delhi violence Amit Shah should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.