सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यांच्या बिहारमध्ये चर्चेमुळे महाआघाडी राहणार कायम, भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 08:28 AM2021-10-28T08:28:04+5:302021-10-28T08:38:05+5:30
RJD-Congress alliance in Bihar : सोनिया गांधी यांच्या फोननंतर लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : बिहारमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाची महाआघाडी फुटल्यानंतर सोनिया गांधी यांनी बुधवारी लालुप्रसाद यादव यांना फोन करून, त्यांची नाराजी दूर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व पदाधिकार्यांच्या काल, मंगळवारी झालेल्या बैठकीत बिहारचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी राजदशी कायमस्वरूपी संबंध तोडून टाकण्याची मागणी केली होती.
त्यावेळी सोनिया गांधी काही बोलल्या नाहीत. पण त्यांना स्वत:ला राजदशी असलेली आघाडी तुटणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आज थेट लालुप्रसाद यांना फोन करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
भक्त चरण दास गेले काही दिवस बिहारमध्ये सातत्याने राजद व तेजस्वी यादव यांच्याविरोधात बोलत असल्याने लालुप्रसाद नाराज
होते.
सोनिया गांधी यांच्या फोननंतर यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले.
एकंदरच यादव व सोनिया गांधी यांच्या संभाषणानंतर बिहारमधील महाआघाडी कायम राहील आणि भक्त चरण दास यांच्याऐवजी अन्य नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाईल, अशी चर्चा आहे. मुळात बिहारमधील कन्हैया कुमार यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे तेजस्वी यादवना आवडलेले नाही. त्या दोघांत ३६ चा आकडा आहे. त्यातच कुशेश्वरस्थान व तारापूर या दोन्ही पोटनिवडणुकांत उमेदवार उभा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याने महाआघाडीत फूट पडल्यात जमा होती.