सोनिया गांधी चार वर्षांनंतर प्रचारात; २०१९ नंतर पहिलीच निवडणूक सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 11:44 AM2023-05-06T11:44:11+5:302023-05-06T11:44:28+5:30
कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांनी आतापर्यंत १७ रोड शो केले असून सभाही घेतल्या आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी १९ रोड शो केले आहेत.
आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी शनिवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार आहेत. त्या चार वर्षांनी प्रचारात उतरणार असून हुबळी येथे त्या प्रचार करणार आहेत.
कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांनी आतापर्यंत १७ रोड शो केले असून सभाही घेतल्या आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी १९ रोड शो केले आहेत. तसेच, सभाही घेतल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांची ही पहिलीच निवडणूक सभा असेल. २ मे २०१९ रोजी त्यांनी रायबरेलीत प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर १४ डिसेंबर २०१९ रोजी सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका सभेला संबोधित केले होते, पण ती निवडणुकीची सभा नव्हती, तर महागाईच्या मुद्यावरील सभा होती.
रायबरेलीतील सभेनंतर सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतही प्रचार केला नाही. त्यानंतर जयपूरमध्ये २०२१ मध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठीही सोनिया गांधी यांनी भाषण केले नव्हते. चार वर्षांनंतर आज सोनिया गांधी कर्नाटकात हुबळी येथे प्रचार सभेला संबोधित करणार आहेत.
काँग्रेस नेता करणार विक्रम
हलियाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असू शकते असे म्हटले आहे. देशपांडे कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवून नवव्यांदा आमदार बनण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न करतील. देशपांडे (७६) हे सलग नवव्यांदा निवडणूक लढवणारे राज्यातील काँग्रेस उमेदवारांपैकी ज्येष्ठ उमेदवार आहेत. राज्यात सर्वाधिक विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली आहे.
ईडी, सीबीआय भाजपला मते मिळवून देणार नाही : ममता
समशेरगंज : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी)सारख्या तपास यंत्रणा पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपला मते मिळवून देणार नाहीत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भाजपवर केली.
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज येथे एका सरकारी कार्यक्रमाला संबोधित करताना ममता यांनी सर्व विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन भाजपशी लढण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे, परंतु तपास यंत्रणा मत मिळविण्यासाठी मदत करणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.