सोनिया गांधी यांनी घेतली शरद पवार, फारुक अब्दुल्ला आदी नेत्यांची भेट; विरोधी ऐक्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:06 AM2021-12-15T06:06:29+5:302021-12-15T06:06:55+5:30
Sonia Gandhi Meets Sharad Pawar, Farooq Abdullah : ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न.
नवी दिल्ली : यूपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडी शिल्लक आहेच कुठे, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी केल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला तसेच द्रमुक व शिवसेनेच्या नेत्यांशी विरोधी ऐक्याबाबत चर्चा केली.
या बैठकीला शिवसेनेतर्फे खा. संजय राउत आणि द्रमुकचे टी. आर. बालू हेही हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही श्रीमती गांधी यांनी निमंत्रित केले होते. त्यांचे प्रतिनिधी म्हणून वरील दोघे नेते बैठकीसाठी गेले होते. राज्यसभेच्या १२ सदस्यांचे करण्यात आलेले निलंबन, मोदी सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे होणारे प्रयत्न, धार्मिक उन्मादाचे वातावरण तयार करण्यासाठी सरसावलेल्या भाजप व संबंधित संघटना, विविध समाजघटकांत निर्माण झालेली असुरक्षितता, शेतकरी प्रश्न आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही काळात यूपीए निष्क्रिय झाली असून, तिच्यात जिवंतपणा आणण्यासाठी आणि विरोधी पक्षांनी एकत्रित काही कार्यक्रम व आंदोलने करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. यूपीएचे अस्तित्व पुन्हा सरकारला आणि जनतेला दाखवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, यावर सर्वांचे मतैक्य झाले.
या पक्षांनाही सोबत घेणार?
सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अन्य पक्षांना एकत्र आणण्यावरही चर्चा झाली. त्यासाठी सोनिया गांधी व शरद पवार यांच्या पुढाकाराने यापुढे अन्य विरोधी नेत्यांच्याही बैठका होणार आहेत. त्यासाठी राजद, समाजवादी पक्ष, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा राष्ट्रीय समिती यांच्याशी शरद पवार व अन्य नेते बोलतील, असे समजते.
पवार यांच्यावर जबाबदारी
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही मनवळवणी करावी, असे बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. ती जबाबदारी शरद पवार यांच्यावर असेल, असे समजते. सोनिया गांधी व ममता बॅनर्जी यांच्यात कडवटपणा आला असून, शरद पवार ताे दूर करू शकतील, असे मत व्यक्त झाले.