सोनिया गांधींनी दिली गडकरी यांना शाबासकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:59 AM2019-02-08T06:59:18+5:302019-02-08T06:59:41+5:30
भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरींना आपल्या विभागांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल गुरुवारी लोकसभेत थेट यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडून शाबासकीची थाप मिळाली.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरींना आपल्या विभागांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल गुरुवारी लोकसभेत थेट यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडून शाबासकीची थाप मिळाली. प्रश्नोत्तराच्या तासात विविध खासदारांनी गडकरींच्या कार्यशैलीची मनमोकळेपणाने तारीफ केली तेव्हा सोनिया गांधी व काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेही बाके वाजवून गडकरींची दिलखुलास प्रशंसा करण्यात सहभागी झाले. मोदी सरकारच्या कारकिर्दीत साऱ्या सभागृहालाच आश्चर्याचा धक्का देणारा हा एकमेव प्रसंग होता.
काँग्रेसचे सदस्य निनोंग इरिंग यांनी भारतमाला प्रकल्पाशी निगडित प्रश्न विचारल्यानंतर सभागृहात पूरक प्रश्नांमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे व उत्तराखंडातील चारधाम प्रकल्पाशी संबंधित प्रश्नांची मालिकाच गडकरींवर सुरू झाली. इरिंग यांच्या व्यतिरिक्त भाजपाचे सुधीर गुप्ता, शिवसेनेचे अढळराव पाटील, काँग्रेसचे सुनील जाखड, भाजपाचे दुष्यंतसिंग व रमेश पोखरीयाल आदींच्या उपप्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक खासदाराने रस्ते, वाहतूक, जलसंपदा, नदी विकास, गंगा शुद्धीकरण मंत्रालयांच्या वेगवान कामकाजाबद्दल गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे या नव्या द्रुतगती महामार्गाचे लक्षवेधी तपशील गडकरी नमूद करीत असताना, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही राहवले नाही. मध्येच हस्तक्षेप करीत गडकरींना त्यांनी विचारले, या नव्या एक्स्प्रेस-वेला जोडणारा इंदूरहून मंदसौर येथे जाणारा नवा महामार्ग तयार होईल काय? विविध पक्षांच्या खासदारांनी आपापल्या प्रश्नांबरोबर नितीन गडकरींच्या कार्यशैलीवर स्तुतीसुमने उधळली.
त्यांना उत्तर देतांना गडकरी म्हणाले, ‘मी भाग्यवान आहे, प्रत्येक पक्षाचे खासदार खुल्या दिलाने सभागृहात सांगत आहेत की त्यांच्या मतदारसंघात माझ्याकडे असलेल्या विभागांचे कामकाज चांगले झाले आहे’. गडकरींचे विस्तृत उत्तर संपताच, भाजपाचे खासदार गणेश सिंह यांनी लोकसभाध्यध्यक्षांना विनंती केली की इतके चांगले काम करणाºया गडकरींना धन्यवाद देणारा प्रस्ताव पक्षभेद विसरून सभागृहाने मंजूर केला पाहिजे. याचे स्वागत करीत खासदारांनी बाके वाजवून गडकरींना दिलखुलास दाद दिली. सोनिया गांधीसुद्धा बाके वाजवण्यात उत्साहाने सहभागी झाल्या. काँग्रेसचे सभागृहातील नेते खरगे व अन्य काँग्रेसचे खासदारही गडकरींच्या समर्थनार्थ बाके वाजवू लागले.
प्रजासत्ताक दिन संचलनाच्या राजपथावरील कार्यक्रमात नितीन गडकरी आणि राहुल गांधी एकमेकांशेजारी बसले होते. तब्बल तीन तास उभयतांना परस्परांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यानंतरच्या राहुल गांधींनी गडकरींची तारीफ सुरू केली. राहुल म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हेच एकमेव मंत्री असे आहेत की ज्यांच्यात राफेल सौदा, शेतकºयांच्या व्यथा व घटनात्मक संस्थांचे अध:पतन अशा विषयांवर जाहीरपणे बोलण्याची हिंमत आहे. रायबरेलीतील रस्त्यांच्या समस्यांचे विनाविलंब निराकरण केल्याबद्दल गडकरींचे आभार मानणारे पत्र आॅगस्ट महिन्यात सोनिया गांधींनीपाठवले होते.
‘अच्छे दिनाची घोषणा भाजपच्या गळ्यात अडकलेले हाड बनली आहे’ असे विधान ऐकवून गडकरींनी साºया देशाचे लक्ष वेधून घेतले होते. तीन राज्यातल्या भाजपाच्या पराभवानंतर यशाला अनेक बाप असतात, अपयश पोरके असते. यशाचे श्रेय घेणाºया प्रत्येक नेत्याने अपयश स्वीकारण्याची वृत्तीही दाखवली पाहिजे. स्वप्ने दाखवणारे राजकीय नेते लोकांना आवडतात, मात्र स्वप्ने पूर्ण झाली नाही तर तेच लोक अशा नेत्यांची धुलाई देखील करतात अशी विधानेही गडकरींनी केली.
अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदीच गडकरींचे लक्ष्य आहे, असा अर्थ या विधानांमधून ध्वनित होत असल्याने साºया देशाचे लक्ष गडकरींकडे वेधले गेले.
मोदींना पक्षांतर्गत आव्हान देऊ शकणारा एकमेव नेता अशी गडकरींची प्रतिमा बनली. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तर गडकरींच्या साºया विधानांची आपल्या लेखात तारीफ केली. सोनियांकडून गडकरींना मिळालेली शाबासकीची थाप
हा त्याचा उत्तरार्ध असल्याने साहजिकच तो देशाचे चित्त वेधणारा ठरला आहे.