सोनिया गांधी वाघिण आहेत - ज्योतिरादित्य सिंदिया
By admin | Published: May 6, 2016 01:49 PM2016-05-06T13:49:41+5:302016-05-06T13:51:57+5:30
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी भारतीय जनता पार्टी राजकीय षडयंत्र रचत असून सोनिया गांधींवर वाटेल ते आरोप करत आहेत, परंतु सोनिया गांधी या वाघिण आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी भारतीय जनता पार्टी राजकीय षडयंत्र रचत असून सोनिया गांधींवर वाटेल ते आरोप करत आहेत, परंतु सोनिया गांधी या वाघिण आहेत अशी ठाम बाजू काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लोकसभेत मांडली.
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी गैरव्यवहारांना सुरुवात एनडीएच्या काळातच झाल्याचा आरोप करताना, या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम युपीएनेच जाहीर केल्याचे सिंदिया म्हणाले. गांधी परीवारापैकी कुणालाही आर्थिक लाभ दिला नसल्याचे व तसा कुठलाही थेट पुरावा नसल्याचे इटालीच्या कोर्टामध्ये स्पष्ट झाले असूनही भारतीय जनता पार्टीचे नेते मनमानी आरोप करत असल्याचे सिंदिया म्हणाले.
ज्या मिशेलचा संदर्भ दिला जातो, त्याने स्पष्टपणे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना आपण कधीही भेटलो नाही, पत्रव्यवहार झाला नाही, संदेशाची देवाणघेवाण झाली नसल्याचे म्हटल्याकडे सिंदिया यांनी लक्ष वेधले.
केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाची चौकशी का केली नाही असा सवाल विचारत, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सिंदिया यांनी केली आहे.
सिंदिया यांनी अत्यंत आक्रमकपणे काँग्रेसची बाजू लोकसभेत मांडली असून भारतीय जनता पार्टी राजकीय षडयंत्र रचत असून काँग्रेसला नाहक बदनाम करत असल्याचे सांगितले.