लादेनसारख्या व्यक्तीसाठी सोनिया गांधी रात्रभर रडतील
By admin | Published: November 3, 2015 02:09 AM2015-11-03T02:09:06+5:302015-11-03T02:09:06+5:30
ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्यासाठीही सोनिया गांधी रात्रभर रडतील, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि भाजपा नेते मुख्तार अब्बास
नवी दिल्ली : ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्यासाठीही सोनिया गांधी रात्रभर रडतील, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे. तर आपल्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत नकवी यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने केली आहे.
‘ओसामा बिन लादेन यांच्यासारखा एखादा दहशतवादी मेला तर सोनिया गांधी रात्रभर रडतील. त्या क्षणभरही झोपणार नाही. कोणताही दहशतवादी मारला गेला की लगेच त्याचा संबंध धर्माशी जोडला जातो,’ असे नकवी म्हणाले. ते शनिवारी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एका जाहीर सभेत बोलत होते.
विरोधी पक्ष धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात पण धर्माचेच राजकारण करतात, अशी टीकाही नकवी यांनी यावेळी केली. या कार्यक्रमानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना नकवी म्हणाले, २००८ च्या बाटला हाऊस चकमकीनंतर वरिष्ठ काँग्रेस नेते जे काही बोलले होते, त्याचाच पुनरुच्चार आपण केला आहे. काँग्रेस नेते त्यावेळी जे काही बोलले होते, त्याचा आता वेगळाच अर्थ काढण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे नकवी म्हणाले.
नवी दिल्लीतील बाटला हाऊस अपार्टमेंटमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तेथे कारवाई केली होती, ज्यात दोन संशयित दहशतवादी मारले गेले होते. त्यावरून प्रचंड राजकीय वादळ उठले होते आणि ही पोलीस चकमक बनावट असल्याचा आरोप केला गेला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)