सोनिया गांधींचं केजरीवाल वगळता सर्व विरोधकांना भोजनाचं निमंत्रण
By admin | Published: May 25, 2017 10:40 AM2017-05-25T10:40:03+5:302017-05-25T11:55:31+5:30
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनौपचारिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनौपचारिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी सोनिया यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करणे टाळले आहे.
सोनिया गांधी यांनी शुक्रवारी (26 मे) विरोधी पक्षांसाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. याचदरम्यान विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार आहे. ""लंच पे चर्चा""निमित्तानं, नरेंद्र मोदी सरकार तीन वर्ष पूर्ण करत असतानाच सरकारला विरोधकांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी भोजनासाठी स्वत: विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं आहे. माकपचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला हजेर राहणार आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी बुधवारीच नवी दिल्लीत दाखल झाल्या आहे. राष्ट्रपतीपद उमेदवाराबाबत बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत स्वतंत्रितरित्या चर्चादेखील केली आहे.
सोनिया गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी वगळता अन्य विरोधी पक्षांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. आम आदमी पार्टीनं आतापर्यंत विरोधकांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नोंदवला नसल्यानं त्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.
Presidential poll:Bihar CM Nitish Kumar to not take part in opposition leaders" meet called by Sonia Gandhi tomorrow,Sharad Yadav to join in pic.twitter.com/PraeqMA4AJ
— ANI (@ANI_news) May 25, 2017
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. मात्र त्यांचा प्रतिनिधी या बैठकीत सहभाग होईल, अशी माहिती मिळत आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावतीदेखील त्यांचा प्रतिनिधी या बैठकीसाठी पाठवणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव या बैठकीसाठी उपस्थिती लावणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्यासाठी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार यांनी प्रस्ताव धुडकावून लावला असल्याने काँग्रेसला मात्र मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे."गेल्या महिन्यात पार पडलेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी शरद पवार साहेबांना राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी तो धुडकावून लावला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माझा विचार केला जाऊ नये, असे पवार यांनी स्पष्ट केलं आहे", अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. "आपण ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं याआधीही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे", असं नवाब मलिक यांनी सांगितले होते.शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घ्यावी, अशी यूपीएच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, "एनडीएकडे राष्ट्रपदीपदासाठी स्वत:चे उमेदवार जिंकवण्यासाठी आवश्यक बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाही".राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी उमेदवार उभा करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली असून यासाठी सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केली जात आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. यानंतर ममतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली.सोनिया गांधी यांनी यासंबंधी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सिताराम येचुरी आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा हाती असलेल्या एनडीएने मात्र अद्याप उमेदवाराबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही.