मोदींच्या मतदारसंघात सोनिया गांधींचा रोड शो
By admin | Published: August 3, 2016 06:08 AM2016-08-03T06:08:54+5:302016-08-03T06:08:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून पक्षाच्या प्रचाराचा बिगुल फुंकताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे मोठा ‘रोड शो’ केला.
वाराणसी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून पक्षाच्या प्रचाराचा बिगुल फुंकताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे मोठा ‘रोड शो’ केला.
सर्किट हाउस ते इंग्लिशिया लाइनपर्यंत ८ कि.मी. लांबीच्या या रोड शोमध्ये काँग्रेसचे हजारो समर्थक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्किट हाउस येथे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सोनिया गांधी यांनी त्यांच्या रोड शोला प्रारंभ केला. या पवित्र शहरातील गल्ल्या आणि अरुंद रस्त्यातून वाट काढत पक्षाच्या उत्तर प्रदेशातील विजयाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला.
सोनिया गांधी आधी कारमधून प्रवास करीत होत्या; मात्र नंतर छत नसलेल्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली. सोनिया यांनी लोकांना हात हलवून अभिवादन करताना मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाही दिल्या. मुस्लीम महिलांच्या गटासह समर्थकांच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी त्या अनेकदा वाहनातून बाहेर आल्या. रोड शोने अनेक भागांतून मार्गक्रमण केले. या वेळी सोनिया आणि त्यांच्या ताफ्यावर आजूबाजूच्या इमारतींतून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
तत्पूर्वी मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचार मोहिमेसाठी सोनिया यांचे येथील विमानतळावर आगमन झाले. विमानतळाहून शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत दुचाकी फेरी काढून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
>सारे नेते एकत्र; ‘२७ साल, यूपी बेहाल’चा नारा
वाहनांच्या ताफ्यातील अनेक वाहनांवर ‘२७ साल, यूपी बेहाल’ या घोषणांचे बॅनर्स होते, तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या हातातही याच घोषणांचे फलक होते. पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित, काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद तिवारी तसेच संजय सिंह आदी नेते सोनिया यांच्यासोबत होते.
सोनिया गांधी संध्याकाळी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार होत्या. मात्र त्यांना प्रचंड ताप असल्याने त्या दर्शन घेऊ शकल्या नाहीत. तसेच पत्रकार परिषदही घेऊ शकल्या नाहीत. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या.