सोनियांनाही वादात खेचले
By admin | Published: July 2, 2015 01:57 AM2015-07-02T01:57:03+5:302015-07-02T01:57:03+5:30
आयपीएलचे वादग्रस्त माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते खा.वरुण गांधी
नवी दिल्ली : आयपीएलचे वादग्रस्त माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते खा.वरुण गांधी यांना या वादात खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
आपली काकू सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी वरुण गांधी यांनी एका सौद्याचा प्रस्ताव मांडला होता,असा दावा ललित मोदी यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरुण गांधी यांनी ललित मोदींना लंडनमध्ये भेटल्याचे मान्य केले मात्र हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून फेटाळला आहे.
यासंदर्भातील अन्य एका टिष्ट्वटमध्ये मोदी म्हणतात, मिस्टर वरुण गांधी आपण काय बोलले होतात ते जगाला सांगा. आमचे चांगले मित्र या घटनेचे साक्षीदार असून ते जागतिक स्तरावरील नामवंत ज्योतिषी आहेत. आपण लंडनमध्ये माझ्या घरी आला होतात की नाही हे स्पष्ट करा.
काही वर्षांपूर्वी लंडनमधील रिट्ज हॉटेलमध्ये थांबले असताना ज्या काकूचा उल्लेख आपण केला होता त्या सोनिया गांधी आहेत. दुसरीकडे भाजपने या टिष्ट्वटबॉम्बचा आरोपाचा वापर काँग्रेसवर लक्ष्य साधण्यासाठी करताना सोनिया गांधी यांच्याकडून याप्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वरुण गांधी यांनी लंडनमध्ये भेट घेतल्याचा दावा
-ललित मोदी यांना व्हिसासाठी मदत केल्याच्या आरोपामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. याप्रकरणानंतर ललित मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका आणि जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लंडनभेटीचा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक टिष्ट्वटस्फोट होत असून कुणाचे नाव समोर येणार याची धास्तीच बसली आहे. या मालिकेत मोदी यांनी गांधी काकू-पुतण्यास लक्ष्य केले आहे.
-वरुण गांधी काही वर्षांपूर्वी मला भेटण्यासाठी माझ्या लंडनमधील घरी आले होते. आपल्या काकूच्या (सोनिया गांधी) मदतीने संपूर्ण प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि यासाठी इटलीतील त्यांच्या बहिणीची मी भेट घ्यावी अशी त्यांची इच्छा होती,असा दावा त्यांनी मंगळवारी रात्री टिष्ट्वटमध्ये केला आहे.
-आमच्या एका मित्राने नंतर सोनिया गांधी यांच्या बहिणीशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी ६ कोटी डॉलर्सची (अंदाजे ३६० कोटी) मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप मोदी यांनी केला आहे.
-वरुण गांधी यांनी हा आरोप फेटाळताना सांगितले की, यात काहीही तथ्य नसून अशाप्रकारच्या वायफळ बडबडीला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. याप्रकरणी भाजप नेतेही वरुण यांच्या बचावात पुढे आले आहेत. दोघेही वेगवेगळ्या पक्षात असून दोन्ही कुटुंबांमध्ये कसे संबंध आहेत याची साऱ्या जगाला कल्पना आहे, असा युक्तिवाद भाजपने केला आहे.
परराष्ट्रमंत्री स्वराज यांच्या पतीला दिला होता नोकरीचा प्रस्ताव
ललित मोदींनी स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना आपल्या कंपनीतील संचालक बोर्डात सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता, असे वृत्त खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.
या नव्या खुलाशाने विरोधक मोदी सरकारविरोधात आणखी आक्रमक झाले असून काँग्रेसच्या हाती आयते कोलित सापडले आहे. ललित मोदींनी कौशल यांना इंडोफिल या रसायन कंपनीत ‘अल्टरनेट डायरेक्टर’ बनण्याचा प्रस्ताव दिला होता.
प्रस्ताव दिला होता, पण नंतर तो मागे घेतला गेला
दरम्यान] सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना संचालकपदाचा प्रस्ताव दिला असला तरी संचालक मंडळापुढे येण्यापूर्वीच माझ्या मुलाने (ललित मोदी) तो मागे घेतला होता, असे ललित मोदी यांचे वडील आणि इंडोफिल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व प्रबंध संचालक के.के. मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्ताव मी नाकारला होता
खुद्द स्वराज कौशल यांनी ललित मोदींच्या कंपनीकडून अल्टरनेट डायरेक्टर पदाचा प्रस्ताव मिळाल्याचे मान्य केले असले तरी, आपण हा प्रस्ताव नाकारला होता, असे स्पष्ट केले आहे.