सोनिया, राहुल गांधी आज न्यायालयात हजर होणार
By admin | Published: December 19, 2015 01:42 AM2015-12-19T01:42:26+5:302015-12-19T01:42:26+5:30
नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य तीन नेते आज शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमक्ष
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य तीन नेते आज शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमक्ष हजर होणार आहेत. आपण शनिवारी न्यायालयात हजर राहणार असल्याचे स्वत: सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहणार असल्यामुळे पटियाला हाऊस न्यायालय परिसरातील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आपण शनिवारी न्यायालयापुढे हजर होणार आहात काय, असे पत्रकारांनी विचारले असता सोनिया गांधी यांनी ‘स्वाभाविक आहे,’ असे उत्तर दिले.
सुब्रम्हण्यम स्वामी यांनी हे नॅशनल हेराल्ड प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. या संदर्भात न्यायालयाने या सर्व नेत्यांना समन्स जारी केला होता. काँग्रेस नेत्यांनी या समन्सविरुद्ध उच्च न्यायालयात धावही घेतली होती, पण न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि न्यायालयापुढे व्यक्तिगतरीत्या हजर राहण्यापासून सुटही दिली नाही.