सत्यकथनासाठी सोनिया स्वत:च लिहिणार पुस्तक
By Admin | Published: August 1, 2014 04:30 AM2014-08-01T04:30:59+5:302014-08-01T04:30:59+5:30
माझी कहाणी मीच शब्दबद्ध करणार असून, त्या पुस्तकातून सत्य बाहेर येईलच, या शब्दांत गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी विदेशमंत्री नटवर सिंग यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
नवी दिल्ली : माझी कहाणी मीच शब्दबद्ध करणार असून, त्या पुस्तकातून सत्य बाहेर येईलच, या शब्दांत गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी विदेशमंत्री नटवर सिंग यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
मी स्वत: पुस्तक लिहीन तेव्हा तुम्हाला सर्व बाबी कळतील. सत्य बाहेर येण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. मी त्याबाबत गंभीर असून, निश्चितच लिहिणार आहे, असे त्यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांना सांगितले. नटवर सिंग यांनी आत्मचरित्रात २००४मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार देण्यामागच्या कारणांचा तपशील दिला आहे. नटवर सिंग यांच्या लिहिण्याने मला धक्का पोहोचलेला नाही. अशा बाबींचे मला वाईट वाटत नाही. मी याहीपेक्षा वाईट बघितले आहे. पती राजीव गांधी यांची स्फोटात तर सासू इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
हे मार्केटिंगचे तंत्र - डॉ. मनमोहन सिंग
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयातून फायली जात होत्या, हा नटवर सिंग यांनी केलेला आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावला. नटवर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेले विधान म्हणजे येऊ घातलेल्या पुस्तकाचे मार्केटिंग आहे, असेही ते म्हणाले. तत्कालीन प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान कार्यालयासंबंधी निर्णय सोनिया गांधीच घेत असत असा दावा केला होता. त्यालाही उत्तर देण्याची संधी डॉ. मनमोहन सिंग यांनी साधली.
आपल्या पुस्तकांचे मार्केटिंग करण्याची ही या लोकांची पद्धत आहे, असा टोला त्यांनी लगावला. संजय बारू यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असे संबोधले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)