सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:31 AM2019-04-04T07:31:01+5:302019-04-04T07:31:46+5:30

नेतृत्वाविना श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही पक्षाच्या यशाची उंची काही वाढत नव्हती.

Sonia's conscience says 'Manmohan Singh' | सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

Next

वसंत भोसले

नेतृत्वाविना श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही पक्षाच्या यशाची उंची काही वाढत नव्हती. सन १९९९ मध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा (११४) मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपसह सर्व विरोधी पक्षांना आता पुढील काही दशके आपलीच आहेत, परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांना स्वीकारलेच जाणार नाही, असे वाटू लागले होते. सन २००४ च्या निवडणुकीत आज अनपेक्षितरीत्या पराभव झाल्यावर भाजपने हा परकीय नागरिकत्वाचा मुद्दा लावून धरला. त्या पार्श्वभूमीवर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे की न स्वीकारावे याचा बराच खल चालू होता. कॉँग्रेस १४५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. डाव्या आघाडीला ६0 जागा मिळाल्या होत्या शिवाय इतर अनेक पक्षांनी कॉँग्रेसने स्थापन केलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा दिला होता. कॉँग्रेस पक्षाने संसदीय नेतेपदी श्रीमती सोनिया गांधी यांची निवड केली. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भेट घेऊन काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावाही केला. मात्र, नेतेपद स्वीकारण्यास सोनिया गांधींनी नकार दिला. कॉँग्रेसच्या संसदीय पक्षाची संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक भरली आणि त्यात अचानकपणे माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव सोनिया गांधी यांनी सुचविले. त्यास सर्वांची अनुमती आहे, असेच त्यांनी जाहीर करून टाकले. त्या म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत माझा अंतरात्मा सांगत आहे की, आपण पंतप्रधानपद स्वीकारू नये आणि त्या पदासाठी योग्य व्यक्ती डॉ. मनमोहन सिंग आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात आताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाट या गावी डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म दि. २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले. आॅक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची डॉक्टरेट केल्यानंतर १९६६-६९ या काळात त्यांनी संयुक्त राष्टÑसंघात काम केले. तत्कालीन वाणिज्य व उद्योगमंत्री ललितनारायण मिश्रा यांनी त्यांना आपल्या मंत्रालयात सल्लागार म्हणून निवडले. त्यांची सरकारी नोकरी सुरू झाली. पुढे १९७० व ८० च्या दशकात त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागारही होते. रिझर्व्ह बॅँकेचे गर्व्हनर म्हणूनही त्यांनी १९८२ ते ८५ मध्ये काम केले. त्यानंतर दोन वर्षे ते नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यांच्या जीवनाला १९९१ मध्ये कलाटणी मिळाली. देशाची आर्थिक स्थिती हलाखीची असताना पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले होते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदासाठी निवड केली. सलग पाच वर्षे पदावर असताना देशाला त्यांनीनव्या आर्थिक धोरणांची दिशा दिली. आर्थिक उदारीकरण व खुलेपणा त्यांनी आणला. त्यावर खूप टीका झाली, तरी ते मागे हटले नाहीत. परिणामी देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात आर्थिक गाडी रुळावर आली.
नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कॉँग्रेसचे सरकार आले नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना (१९९८ ते २००४) डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी केली. ‘शायनिंग इंडिया’चा नारा या काळात भाजपने दिला. मात्र, तो पुरेसा नाही, याची खात्री डॉ. मनमोहन सिंग यांना होती. भाजपच्या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी त्यांचे नाव सुचविल्याने देशाचे नेतृत्व करण्याची संधी या अर्थशास्त्रज्ञाला मिळाली. पुढे दहा वर्षे ते या पदावर राहिले.

भाजप आघाडीचा पराभव झाल्याने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील संपुआला सरकार स्थापण्याची संधी आली. भाजपने सोनियांच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर रान उठवूनही तो टिकला नाही, पण त्यांनी पंतप्रधानपद नाकारून अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केली.

उद्याच्या अंकात ।
सिंग इज किंग...!

Web Title: Sonia's conscience says 'Manmohan Singh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.