मणिपूर घटनेतील आरोपींचे शिर कापून आणणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस, आचार्य मनीष यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:38 AM2023-07-22T10:38:12+5:302023-07-22T10:45:04+5:30
सोनीपतचे आचार्य मनीष यांनी मोठी घोषणा केली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत केंद्र सरकारवर ताशेरे ओढत याप्रकरणी उत्तर मागितले आहे. दरम्यान, यातच सोनीपतचे आचार्य मनीष यांनी मोठी घोषणा केली आहे.
मणिपूर घटनेतील आरोपींचे शिर कापून आणणाऱ्यांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा आचार्य मनीष यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचार्य मनीष यांनी मणिपूरमधून आरोपींचे शिर कापून आणणाऱ्यांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुलींशी गैरवर्तन करणाऱ्यांना मारणे यालाच धर्म म्हणतात, असे आचार्य मनीष म्हणाले. दरम्यान, आचार्य मनीष हे राष्ट्र स्वाभिमान ट्रस्ट नावाने धार्मिक संस्था चालवतात.
काय घडलं होतं मणिपूरमध्ये?
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला होता. त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.