भारीच! 11 वर्षांपासून शिक्षणासाठी 'तो' करतोय धडपड; गरजू मुलांसाठी खर्च करतो सर्व पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 03:01 PM2023-09-17T15:01:44+5:302023-09-17T15:02:29+5:30
जितेंद्र कुमार आपल्या पगारातून गरजू मुलांच्या फी आणि कोचिंगचा खर्च उचलतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही.
ज्ञानाचा प्रकाश पसरवून अज्ञानाचा अंधार दूर करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखविणारे शिक्षक ईश्वराचं दुसरं रूप मानलं जातात. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबतच शिक्षक समाजाची जाणीव करून देतो. डॉ.जितेंद्र कुमार हे असेच शिक्षक असून मुंडलाना गावचे रहिवासी आहेत. त्यांनी समाजाला शिक्षित करण्याचा निर्धार केला आणि आपले जीवन समाजासाठी समर्पित केलं
डॉ जितेंद्र कुमार हे पंचायत विभागात सचिव म्हणून कार्यरत होते, परंतु विभागातील वाढता भ्रष्टाचार पाहून त्यांनी नोकरी सोडली आणि 2012 मध्ये शिक्षण विभागात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. 2012 मध्ये त्यांनी समलखा येथील मच्छरौली येथील शाळेत प्रवेश घेतला. तिथे शाळेची परिस्थिती बदलली. शाळेतील पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी स्वतः रोपटे लावून त्यांची निगा राखली. त्यांना जिथे रिकामी जागा दिसली तिथे ते झाडे लावतात.
आतापर्यंत 20 हजार रोपांची लागवड
जितेंद्र यांनी आतापर्यंत सुमारे 20 हजार रोपं लावली असून त्यांची स्वत: काळजी घेतली आहे. जितेंद्र आत्तापर्यंत जिथे जिथे होते तिथे त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याबाबत जनजागृती केली. जितेंद्र जिथे राहिला तिथे शाळा हिरवीगार केली. त्यामुळेच विभागाने त्यांचा अनेकदा गौरव केला आहे.
गरजू मुलांच्या शिक्षणाचा उचलला खर्च
जितेंद्र कुमार आपल्या पगारातून गरजू मुलांच्या फी आणि कोचिंगचा खर्च उचलतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. मुलांचा गणवेश, शिक्षण, कोचिंग फी आणि पर्यावरणावर ते आपला पगार खर्च करतात असं सांगितलं. त्यांनी पीएचडीची पदवी प्राप्त केली आहे. 11 वर्षांपासून ते सतत शिक्षण विभागात कार्यरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.