दे दणादण! राष्ट्रीय महामार्गावर टोल कर्मचारी आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा, जोरदार हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:25 AM2023-09-19T10:25:22+5:302023-09-19T10:32:32+5:30
टोल कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली.
हरियाणाच्या सोनीपतमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 334B वर असलेल्या झरोठी टोलवर गोंधळ झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते टोल नाक्यावर पोहोचले होते. याच दरम्यान, टोल कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तीरथ राणा व इतर नेत्यांनी टोल ऑपरेटरवर गंभीर आरोप करत सांगितलं की, टोल ऑपरेटर म्हणतो की, मी एका मोठ्या नेत्याच्या पीएसओचा भाचा आहे, माझं कोणी नुकसान करू शकत नाही. टोल कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या नेत्यांना शिवीगाळ व गैरवर्तन केल्याचं देखील म्हटलं आहे.
दुसरीकडे टोल ऑपरेटर विजेंद्र सिंह यांनी भाजपा नेत्यांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. खरखोडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्या असून, पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तीरथ राणा, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सितेंद्र दहिया आणि अन्य भाजप नेत्यांनी टोल कर्मचाऱ्यांवर आरोप करत सांगितले की, यापूर्वीही टोल कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीच्या बातम्या येत होत्या. टोल कर्मचारी महिलांशी गैरवर्तन करतात. टोल कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास टोल नाक्यावर आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला.
टोल ऑपरेटर विजेंद्र सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले असून त्यांनी आम्हाला मारहाण केली असून आम्ही भाजपा नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनीपत खरखोडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, झरोठी टोल नाक्यावर भांडण झाल्याची माहिती मिळाली असून आता दोन्ही पक्षांनी तक्रारी दिल्या आहेत. टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.