"पप्पा लवकरच मरणार", उपचारासाठी फिरत होता लेक; सोनू सूद झाला 'देवदूत', म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:28 AM2023-12-06T10:28:32+5:302023-12-06T10:29:36+5:30
Sonu Sood : पल्लव सिंह या तरुणाने आपल्या वडिलांच्या बिघडलेल्या प्रकृतीविषयी आणि एम्स दिल्लीमध्ये हार्ट सर्जरीसाठी लागत असलेली वेळ, समस्या याबाबतचा त्रास ट्विटरवर शेअर केला होता.
अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकली आहेत. दिल्ली एम्समध्ये रुग्णांच्या वाढत्या गर्दीमुळे वडिलांचा जीव वाचवण्यासाठी एका मुलाला सोशल मीडियाची मदत घ्यावी लागली. सोशल मीडियावर त्याने पोस्ट लिहून मदत करण्याचं आवाहन केलं होतं. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत होती. याच दरम्यान या पोस्टवर आता सोनू सूदने उत्तर दिलं असून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
पल्लव सिंह या तरुणाने आपल्या वडिलांच्या बिघडलेल्या प्रकृतीविषयी आणि एम्स दिल्लीमध्ये हार्ट सर्जरीसाठी लागत असलेली वेळ, समस्या याबाबतचा त्रास ट्विटरवर शेअर केला होता. काही वेळातच ही पोस्ट खूप व्हायरल झाली. यानंतर आता या तरुणासाठी सोनू सूद देवदूत ठरला आहे. "भाऊ, आम्ही तुझ्या वडिलांना मरू देणार नाही" असं सोनूने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लव सिंह हा उत्तर प्रदेशातील देवरियाचा रहिवासी आहे.
We won’t let your father die brother.
— sonu sood (@SonuSood) December 4, 2023
Message me ur number directly on my personal twitter id inbox .. kindly don’t share on a tweet. @SoodFoundation 🇮🇳 https://t.co/rkq8WuhvXu
पल्लवने पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या वडिलांचे हृदय केवळ 20 टक्के काम करतं. एम्सच्या रांगेत उभ्या असलेल्या पल्लवने पोस्ट केली होती यामध्ये, "माझे वडील लवकरच मरणार आहेत. होय, मला माहीत आहे मी काय म्हणत आहे. दिल्लीतील एम्सच्या रांगेत उभं राहून मी हे लिहित आहे. मी भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, जी भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आहे. मला वाटत नाही की मी माझ्या वडिलांना वाचवू शकेन" असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करत असताना, पल्लव याने खासगी आरोग्य सेवा परवडत नसल्यामुळे कुटुंबावर होणाऱ्या भावनिक आणि आर्थिक परिणामांचं तपशीलवार वर्णन केलं. पल्लवच्या पोस्टला उत्तर देताना एम्स दिल्लीने लिहिलं की, "एम्स नवी दिल्लीला कळले आहे की कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णाला प्रतीक्षा कालावधी दरम्यान काही समस्या होत्या. आम्ही रुग्ण/मुलाला बोलावले. आम्हाला कळलं की रुग्ण आता देवरिया, यूपीमधील त्याच्या गावी आहे आणि घरी आरामात आहे."