देवदूत! सोनू सूद कार थांबवून जखमीच्या मदतीला धावला; वेळीच उपचार मिळाल्यानं जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:56 AM2022-02-09T09:56:02+5:302022-02-09T10:03:50+5:30
सोनू सूदनं केलेल्या मदतीमुळे तरुणाचा जीव वाचला
एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे मानवता. संकटात सापडलेल्या मदत करणं ही माणुसकी. अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊनमध्ये संकटात सापडलेल्या असंख्य जणांना मदत केली. अडचणीत असलेल्यांसाठी सोनू अक्षरश: देवदूतासारखा धावून गेला. त्यामुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. अनेकांसाठी देवदूत ठरणारा सोनू पंजाबमधील एका अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेला आहे.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपासजवळ एका व्यक्तीचा अपघात झाला. त्याचवेळी सोनू सूद तिथून कारनं जात होता. अपघात पाहून सोनू मदतीसाठी थांबला. दोन वाहनांच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सोनूनं स्वत: बाहेर काढलं आणि त्याला घेऊन रुग्णालय गाठलं. त्यामुळे जखमी व्यक्तीचा जीव वाचला.
मंगळवारी रात्री ही घटना घडली. मोगामधल्या कोटकपुरा बायपासजवळ दोन वाहनांचा अपघात झाला. सोनू त्याच रस्त्यावरून कारनं प्रवास करत होता. अपघात पाहून सोनूनं कार थांबवली. आपल्या टीमच्या मदतीनं सोनूनं जखमी व्यक्तीला अपघातग्रस्त कारच्या बाहेर काढलं. या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे.