कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 02:26 PM2021-11-19T14:26:39+5:302021-11-19T14:29:49+5:30

अनेक सेलिब्रिटींकडून आनंद व्यक्त; शेतकऱ्यांचं अभिनंदन करत मोदी सरकारचे मानले आभार

Sonu Sood Taapsee Pannu And Others Congratulate Farmers On The Repealing Of Farm Laws Kangana Ranaut Calls It Shameful | कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

Next

मुंबई: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

पंतप्रधानांनी तीन कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. अभिनेता सोनू सूदनं या निर्णयासाठी पंतप्रधानांचे आभार मानले. 'ही उत्तम बातमी आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान कार्यालय. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. गुरुनानक जयंतीच्या दिवशी तुम्ही आनंदानं घरी परताल अशी आशा करतो,' असं सोनूनं ट्विटमध्ये म्हटलं.

अभिनेत्री तापसी पन्नूनंदेखील या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. गुरुपुरब दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा असं म्हणत तिनं तीन कायदे रद्द करण्यात आल्याची बातमी शेअर केली. अभिनेत्री सयानी गुप्तानंदेखील शेतकऱ्यांचे कौतुक करत आभार मानले. 'शेतकऱ्यांचं अभिनंदन. तुम्ही हे शक्य करून दाखवलंत. आंदोलन कामी आलं. ज्या शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. देव आपला अन्नदात्यासोबत सदैव राहो. जय जवान, जय किसान!', अशा भावना सयानीनं ट्विटमधून व्यक्त केल्या.

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आजही वादग्रस्त विधान केलं. तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी, लाजिरवाणा असल्याचं तिनं म्हटलं. 'लोकप्रतिनिधींनी संसदेत कायदे करण्याऐवजी लोक रस्त्यावरून येऊन कायदे करू लागले, तर हेदेखील जिहादी राष्ट्र आहे. असं राष्ट्र ज्यांना हवंय, त्या सगळ्यांचे अभिनंदन,' अशा शब्दांत कंगनानं नाराजी व्यक्त केली.

Web Title: Sonu Sood Taapsee Pannu And Others Congratulate Farmers On The Repealing Of Farm Laws Kangana Ranaut Calls It Shameful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.