जिंकलंस भावा... मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी विकलेली गाय परत मिळवून देणार सोनू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 04:57 PM2020-07-23T16:57:35+5:302020-07-23T17:01:00+5:30
सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे.
मुंबई - अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. सोनूच्या या सत्कार्यामुळे तो सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यात आणखी एका कामाची भर पडली आहे. मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाला गरजेचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एका गरीब कुटुंबाने आपली गाय विकली होती. आता, ती विकलेली गाय परत मिळवून देण्याचं काम सोनूने हाती घेतलं आहे.
सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे. लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर हक्काचं छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर झोपणाऱ्या एका महिलेला निवारा देण्याचं आश्वासन त्यानं पाळल. त्यानंतर, आता मुलीच्या शिक्षणासाठी गाय विकणाऱ्या पीडित गरीब कुटुंबाला त्यांची गाय परत मिळवून देण्याचं काम सोनूने हाती घेतलं आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात शाळा-कॉलेजही बंद आहेत. पण, ऑनलाईन क्लासद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, गरीब कुटुंबातील पालकांच्या समस्येत या निर्णयाने आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील ज्वालाजी तालुक्यातील गुंबर गावात एक मनाला चटका लावणारा प्रसंग घडला. गुंबर गावातील कुलदीप नावाच्या व्यक्तीला मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकावी लागली. गाय विकून मिळालेल्या 6000 रुपयांतून त्यानं मुलीला स्मार्टफोन खरेदी करून दिला. या घटनेनंतर प्रशासन आणि सरकारवर टीका होत आहे. आता, या गरीब कुटुंबासाठी सोनू सूद पुढे आला आहे.
Ravinder ji. Can you please share his details. https://t.co/dsKG4eCAmw
— sonu sood (@SonuSood) July 23, 2020
ट्विटरवर अमित बरुहा आणि रविंदर सूद यांनी या पीडित कुटुबीयांची बातमी शेअर केली होती. सोनूने ते ट्विट रिट्वीट करत, कृपया मला या कुटुंबाची संपूर्ण माहिती द्यावी, अशी विनंती सोनूने केली आहे. तसेच, या कुटुंबीयांना त्यांची गाय परत देण्याचं आश्वासनही त्याने दिलंय.
Let’s get this guy’s cows back. Can someone send his details please. https://t.co/zv0Mj8DCh9
— sonu sood (@SonuSood) July 23, 2020