आरोग्य मंत्रालयाचं नवं App, दुर्घटनाग्रस्तांना तात्काळ मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:10 IST2018-12-28T14:03:48+5:302018-12-28T14:10:18+5:30
मोबाईल अॅपच्या मदतीने तातडीने अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच असे एक अॅप लाँच करणार आहेत. मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वांना याचा फायदा मिळणार आहे.

आरोग्य मंत्रालयाचं नवं App, दुर्घटनाग्रस्तांना तात्काळ मिळणार मदत
नवी दिल्ली - एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास अनेकदा उशीर होतो. मात्र रस्ते दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना आता मदतीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. मोबाईल अॅपच्या मदतीने तातडीने अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच असे एक अॅप लाँच करणार आहेत. मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वांना याचा फायदा मिळणार आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पोहचवता यावे हे या अॅपचे उद्दीष्ट आहे.
2015च्या एका आयएएस अधिकाऱ्याने गुगलसोबत एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ही संकल्पना आवडली व त्यांनी आरोग्य मंत्रालयाला यावर काम करण्यास सांगितले. या अॅपच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त स्थळाची माहिती कॉल केल्यावर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेला लोकेशनची माहिती मेसेजच्या मदतीने मिळणार आहे. 2017 मध्ये भारतात 1 लाख 46 हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपच्या मदतीने रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहचण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे सॉफ्टवेअर दुर्घटनास्थळाहून कॉल सेंटरमध्ये कॉल करणार असून या कॉलच्या माध्यमातून जवळची रुग्णवाहिका आणि लोकेशन सहज ट्रॅक करता येईल. अपघात झाल्यानंतर सध्या 108 क्रमांकाची मदत घेतली जाते. यात रुग्णवाहिकेला दुर्घटनास्थळापर्यंत पोहचण्यास उशीर होतो तसेच कधी कधी रुग्णवाहिका अपघाताच्या ठिकाणी पोहचू शकत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे अॅप तयार करण्यात आले आहे.