केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 07:50 AM2020-07-01T07:50:26+5:302020-07-01T07:52:44+5:30
मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येण्यात मोठी भूमिका बजावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनाही स्थान मिळेल.
हरिश गुप्ता
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाची या महिन्यात पुनर्रचना होणार असून, भाजपातही बदल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष, रा. स्व. संघाचे सहसरचिटणीस दत्तात्रय होसबळे व डॉ. कृष्णन गोपाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प. बंगालमधील नेते मुकुल रॉय यांना अवजड उद्योग मंत्रालय दिले जाईल, अशी चर्चा आहे. तिथे विधानसभेच्या निवडणुका असल्यानं त्यांना मंत्रिपद मिळू शकले. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येण्यात मोठी भूमिका बजावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनाही स्थान मिळेल.
ईशान्य भारतात उत्कष्ट कार्य केलेले हिमंत बिस्वा सरमा यांनाही बक्षीस मिळू शकेल. काही मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयात बोलावले होते. त्यांची चर्चा समजली नसली तरी सामान्य कामगिरीमुळे काही रडारवर आहेत. ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत, त्यांचा अतिरिक्त भार कमी होणे शक्य आहे. नड्डा यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर आता त्यांना त्यांची टीम हवी आहे.
अरुण जेटली, सुषमा स्वराज, अनंत कुमार यांच्या निधनामुळे संसदीय मंडळात जागा रिक्त आहेत. निर्मला सीतारामन वा स्मृती इराणी यांना तिथे संधी मिळू शकेल. इराणी यांचे मंत्रिपद कायम ठेवून अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी त्यांना पक्षाचा दिल्लीतील चेहरा बनवावा, अशीही सूचना आहे.