कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 09:09 PM2020-06-20T21:09:33+5:302020-06-20T21:38:41+5:30
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत.
नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीला काही दिवस उलटल्यानंतर आता या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. गलवान खोऱ्यात सैन्य स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर बेसावध क्षणी हल्ला केला. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याक सुरुवातीला भारतीय जवानांचे मोठे नुकसान झाले. मात्र या हल्ल्यातून झटपट सावरत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी मोर्चा सांभाळला आणि बघता बघता चिन्यांना पळता भुई थोडी केली.
मिळालेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यानंतर बिहार रेजिमेंटचे जवान भडकले. अत्यंत रौद्र रूप धारण केलेले हे जवान चिन्यांवर तुटून पडले. भारतीय जवानांचा हा पलटवार पाहून चिन्यांनाही धक्का बसला. दरम्यान, या झटापटीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनच्या १८ सैनिकांच्या माना मुरगळल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १८ चिनी सैनिकांच्या माना मोडून लोंबकळत होत्या. तसेच अनेकांचे चेहरे ओळखण्या पलिकडे गेले होते.
ही झटापट झाली तेव्हा बिहार रेजिमेंटच्या जवानांची संख्या चिनी सैनिकांपेक्षा खूप कमी होती. मात्र अशा विषम परिस्थितीतही समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा सामना करत बहागदूर जवानांनी चिन्यांना अद्दल घडवली. त्यामुळेच आता सीमाप्रश्नावर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याची भाषा चीन बोलत आहे.
द एशियन एज या वृत्तपत्राने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या झटापटीदरम्यान, जवानांनी अंतर्गत क्षमतेचा पुरेपूर वापर केला. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी उभारलेले तंबू हटवण्याचे आदेश बिहार रेजिमेंटला मिळाले होते. त्यावर कारवाई करण्यासाठी बिहार रेजिमेंटचे जवान घटनास्थळावर पोहोचले होते. त्यांनी तंबू हटवण्याचा प्रयत्न केल्यावर चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....
त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप
कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली
गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
दरम्यान, कमांडिग ऑफिसर कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यावर बिहार रेजिमेंटच्या जवानांचा संयम सुटला. मात्र तिथे चिन्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे या झटापटीची माहिती जवळील तुकडीस देण्यात आली. बिहार रेजिमेंटचे घातक पथक घटनास्थळवर पोहोचले तेव्हा त्यांची संख्या केवळ ६० होती. मात्र असे असतानाही भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. चार तास चाललेल्या झटापटीत चिन्यांनी तलवार आणि रॉडने हल्ला केला. मात्र भारतीय जवानांनी ही हत्यारे काढून घेत चिन्यांना त्यांच्याच हत्यारांनी झोडपले. भारतीय जवानांचा हा रुद्रावतार पाहून चिन्यांची एकच पळापळ उडाली. काही जण कडेकपारीत लपले. तेव्हा भारतीय जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. यादरम्यान, काही भारतीय जवान एलएसी पार करून चीनच्या हद्दीत पोहोचले होते. त्यांना नंतर चीनने परत पाठवले आहे.