ऊर्जा खात्यात बदली होताच वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:51 AM2019-07-26T01:51:25+5:302019-07-26T01:51:53+5:30
३३ वर्षांच्या इतिहासात पहिलीच वेळ
नवी दिल्ली : अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाचा वाटा असणारे वित्त सचिव व ज्येष्ठ नोकरशहा सुभाषचंद्र गर्ग यांची सरकारने ऊर्जा मंत्रालयात बदली करताच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. आॅक्टोबर २०२० पर्यंत सेवाकाळ शिल्लक असलेल्या गर्ग यांनी आधीच निवृत्त होण्यास अर्ज केल्याने खळबळ माजली आहे. ३३ वर्षांच्या इतिहासात उच्चपदस्थांनी स्वेच्छानिवृत्ती मागण्याची पहिलीच वेळ आहे.
गर्ग वित्त मंत्रालयातील सर्वांत ज्येष्ठ अधिकारी होते. त्यांच्याकडे अर्थव्यवहार विभागाचा कार्यभार व वित्त सचिवपद होते.
वित्तीय धोरण आणि रिझर्व्ह बँकेशी संबंधित प्रकरणे यांचे प्रमुख होते. त्यांना बुधवारी अचानक ऊर्जा मंत्रालयात हलविण्यात आले. हे मंत्रालय वित्त मंत्रालयापेक्षा कमी दर्जाचे समजले जाते. त्यामुळे ते नाराज असल्याचेही बोलले जाते. यापूर्वी ए. पी. वेंकटेश्वरन यांनी १९८६ साली परराष्ट्र व्यवहार खात्याच्या सचिव पदावरून कार्यकाळ (पान १० वर) संपण्याआधीच निवृत्त घेतली होती.
३१ आॅक्टोबरपासून स्वेच्छानिवृत्त होऊ इच्छितो
गर्ग हे सकाळी नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात आले व दुपारीच निघून गेले. त्यानंतर त्यांनी वित्तसचिवपदाच्या अधिकृत टिष्ट्वट करून स्वेच्छानिवृत्तीची माहिती दिला. त्यांनी म्हटले की, आज आर्थिक सचिव पदाचा कार्यभार हस्तांतरीत केला. वित्त खात्यात बरेच काही शिकायला मिळाले. मी उद्या ऊर्जा खात्यात सचिव पदाचा कार्यभार स्वीकारेन. पण मी ३१ आॅक्टोबरपासून निवृत्त होऊ इच्छितो. हे माझे अखेरचे ट्विट आहे.