देशांतर्गत उड्डाणांसाठी आता लागणार नाही बोर्डिंग पास, चेहरा पुरेसा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 10:21 AM2018-10-04T10:21:06+5:302018-10-04T13:24:36+5:30
देशांतर्गत तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे.
नवी दिल्ली- देशांतर्गत तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आता देशांतर्गत प्रवासादरम्यान बोर्डिंग पासची गरज लागणार नाही. लवकरच या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. प्रवाशांना विमानतळावर बोर्डिंग पासशिवाय प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार चेह-याच्याद्वारे ओळख पटवण्याची व्यवस्था लागू करणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून चेह-याद्वारे ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
सुरुवातीला ही व्यवस्था दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूतील विमानतळांवर लागू केली जाणार आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाकडून ही व्यवस्था वाराणसी, विजयवाडा, पुणे आणि कोलकाता विमानतळावर लागू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिजिटलच्या माध्यमातून राबवली जाणार असून, येत्या 5 ते 6 महिन्यांत विमानतळ प्राधिकरण ही व्यवस्था भारतातल्या 4 विमानतळांवर लागू करणार आहे.
त्यानंतर इतर विमानतळांवरही या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. डोळे आणि अंगठ्याऐवजी चेह-यानं प्रवाशांची ओळख पटवण्याची व्यवस्था सरकार करणार आहे. हा नियम जगभरात लागू असून, चेहरा हे स्कॅनिंगच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं प्रभावी माध्यम आहे.