आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ; सीमेवरील आव्हानांसाठी आम्ही सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 01:14 AM2020-01-12T01:14:15+5:302020-01-12T01:14:31+5:30
भारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हे आपल्या देशाचे अविभाज्य अंग आहे, असा संकल्प आपल्या संसदेचा आहे. जर संसदेने आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू, असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले. माणेकशॉ सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय लष्कर हे भारतीय राज्यघटनेला प्राधान्य देते. गुप्तचर विभागाकडून आम्हाला विविध प्रकारची माहिती दररोज मिळत असते. त्या आधारेच त्यावर काम केले जाते. पाकिस्तानच्या बॅट या लष्करी तुकडीची माहिती आपल्याला मिळाली आणि बॅटच्या कारवाया आपण हाणून पाडल्या, असे नरवणे यांनी सांगितले.
लष्करप्रमुख म्हणाले की, पाकिस्तान व चीन या दोन्ही सीमांवरील आव्हाने परतवून लावण्यासाठी आपण सज्ज आहोत. अत्याधुनिक उपकरणांबरोबरच लष्कराला योग्य प्रशिक्षण देण्याचे कामही केले जात आहे. लष्करातील विविध विभागांशी समन्वय आणि एकत्रीकरण ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळाची पावले ओळखून लष्कराला आधुनिक बनविले जात आहे. कुठल्याही बाबींची कमतरता नाही. अतिमहत्त्वाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.
महिलांची तुकडी लवकरच होईल दाखल
लष्करातील महिलांच्या १०० जणांच्या तुकडीचे प्रशिक्षण ६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. लवकरच ही तुकडी दाखल होईल. सैन्यामध्ये येण्यासाठी लाखो अर्ज येत आहेत. मात्र, आमच्या निकषात बसत असलेल्यांनाच संधी दिली जात आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.
कोणत्याही आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देऊ
भारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल, असे सांगून मनोज नरवणे म्हणाले की, अपाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तर होवेत्झर आणि धनुष या आधुनिक तोफा मिळाल्याने लष्कर सशक्त झाले आहे. कुठल्याही प्रकारच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.