भूसंपादन विरोधाची सूत्रे राहुल गांधींकडे
By admin | Published: March 31, 2015 02:23 AM2015-03-31T02:23:38+5:302015-03-31T02:23:38+5:30
बहुचर्चित भूसंपादन विधेयकाला संसदेत तीव्र विरोध सुरू असताना परदेशी सुटीवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशात परतताच जनतेच्या दरबारात या
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
बहुचर्चित भूसंपादन विधेयकाला संसदेत तीव्र विरोध सुरू असताना परदेशी सुटीवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशात परतताच जनतेच्या दरबारात या विधेयकाविरोधी लढाईचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून १९ एप्रिलला दिल्लीत भूसंपादन विधेयकाविरुद्ध ‘महा किसान रॅली’चे आयोजन काँग्रेसने केले आहे. खा. राहुल त्यापूर्वी बहुचर्चित सुटी संपवून भारतात परतून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने आक्रमक झालेल्या काँग्रेसने जनाधार वाढविण्याच्या उद्देशाने सोमवारी आॅनलाईन आणि अॅप आधारित सदस्यनोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण
कौर यांनी नवी दिल्लीतील निवासस्थानी या अप्लिकेशनची सुरुवात केली.
राहुल गांधी यांनी ‘आत्मचिंतना’साठी २२ फेब्रुवारीपासून सुटी घेतली असून त्यांच्या ठावठिकाण्याबाबतही तर्कवितर्क केले जात होते. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ते देशात आहेत की विदेशात, ते सांगण्याचे टाळले होते. राहुल यांच्या अनुपस्थितीत संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच भूसंपादन विधेयकाविरुद्धच्या आंदोलनाची धुरा सांभाळली. या महिन्याच्या प्रारंभी १४ पक्षांची एकजूट करीत त्यांनी राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेत राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना भेटून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला. तथापि
राहुल मायदेशी परतताच सूत्रे त्यांच्याकडे दिली जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या मुख्यालयात सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी एकसूरात राहुल गांधी लवकरच परतणार असे संकेत दिले; मात्र तारखेबाबत मौन पाळले. राहुल यांच्या उपस्थितीची खातरजमा केल्यानंतरच रॅलीची तारीख निश्चित केल्याचे समजते. माजी संरक्षण मंत्री ए.के. अॅन्टोनी यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या सरचिटणींसासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसे संकेत देण्यात आले. अॅन्टोनी हे राहुल गांधी यांचे निकटस्थ आणि त्यांचे ‘राजकीय गुरू’ही मानले जातात. संसदेचे अधिवेशन एक महिन्याच्या अवकाशानंतर २० एप्रिलला सुरू होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली महारॅलीने दणाणून जाईल.