माफ करा, माझ्याकडून चूक झाली, चंडीगड महापौर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची बिनशर्त माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:05 PM2024-04-06T12:05:54+5:302024-04-06T12:06:43+5:30
Chandigarh Mayor Election: चंडीगड महापौर निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांनी आपल्या वर्तनाबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडे बिनशर्त क्षमायाचना केली.
नवी दिल्ली - चंडीगड महापौर निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांनी आपल्या वर्तनाबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडे बिनशर्त क्षमायाचना केली. खंडपीठासमोर कथितरीत्या खोटे निवेदन करणे व मतमोजणीदरम्यानचे दुष्कृत्य याबद्दल न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचेही आदेश दिले होते.
चंडीगड महापौरपद निवडणुकीचा ३० जानेवारीचा निकाल फिरवत सर्वोच्च न्यायालयाने आप-काँग्रेस आघाडीचे पराभूत उमेदवार कुलदीप कुमार यांना चंडीगडचे नवे महापौर म्हणून घोषित केले होते. मतपत्रिका बाद व्हाव्यात म्हणून मसीह यांनी आठ मतपत्रिकांवर खुणा केल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते. बिनशर्त माफी मागत मसीह म्हणाले, यापूर्वीचे माझे शपथपत्र मी मागे घेईन. शपथपत्रात त्यांनी आपल्याला नैराश्य व चिंतेने ग्रासलेले असल्याचे म्हटले होते. तसेच मतपत्रिकांशी छेडछाड केल्याचा आरोप नाकारला होता. ‘निवडणूक प्रक्रियेचे कथित व्हिडीओ चित्रीकरण ३१ जानेवारीला व्हायरल झाले होते.
त्यानंतर राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह सोशल मीडियाद्वारे प्रचंड टीका व ट्रोलिंगला आपल्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे आपण व कुटुंबातील सदस्यांवर मानसिक आघात होऊन सर्वजण तणावात असल्याचेही त्यांनी या शपथपत्रात म्हटले होते. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मसीह यांची बाजू मांडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला रोहतगी यांनी सांगितले की, त्यांनी माफी मागितली आहे जी पूर्णपणे बिनशर्त आहे. मी त्यांना आधीचे प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचा तसेच न्यायमूर्तींना शरण जाण्याचा सल्ला दिला आहे. हे माझे आदरपूर्वक निवेदन आहे.” खंडपीठाने २३ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली.