मंदिरातील घंटा वाजवल्याने ध्वनिप्रदूषण! प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोसायटीला बजावली नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:30 PM2024-08-22T17:30:18+5:302024-08-22T17:31:09+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौर सौंदर्यम सोसायटीच्या सार्वजनिक आवारात एक मंदिर आहे. तिथे सोसायटीच्या रहिवाशांकडून नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ पूजा करण्यात येते. यादरम्यान, मंदिरातील घंटा जोरात वाजवली जाते, (Sound pollution ) अशी तक्रार काही रहिवाशांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिली होती.
ग्रेटर नोएडा पश्चिम येथी एका प्रसिद्ध सोसायटीमध्ये मंदिरातील घंटा जोरात वाजवल्याने ध्वनिप्रदूषण झाल्याचा दावा करत उत्तर प्रदेशप्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिस बजावली. ही नोटिस बजावण्यात आल्यानंतर या सोसायटीमधील रहिवासी आणि अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने याला तीव्र विरोध केला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटिस मागे घेतली. मात्र आता या प्रकरणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौर सौंदर्यम सोसायटीच्या सार्वजनिक आवारात एक मंदिर आहे. तिथे सोसायटीच्या रहिवाशांकडून नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ पूजा करण्यात येते. यादरम्यान, मंदिरातील घंटा जोरात वाजवली जाते, अशी तक्रार काही रहिवाशांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिली होती.
ही तक्रार मिळाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी मंदिरातील घंटेचा आवाज ७२ डेसिबल असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गौर सौंदर्यम सोसायटीच्या अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनला एक नोटिस बजावली. तसेच घंटेचा आवाज ५५ डेसिबलच्या आत ठेवण्याबाबत सूचना दिली. त्यानंतर सोसायटीच्या अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पूजा करताना हळू घंटा वाजवण्याबाबत सदस्यांना आवाहन केले.
मात्र या नोटिशीनंतर सोसायटीमधील लोकांनी याला तीव्र विरोध केला. तसेच या नोटिशीची प्रतही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. तसेच त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्री उशिरा ही नोटिस मागे घेतली.