दक्षिण आफ्रिका संघाची रणनीती चकित करणारी, पण पराभव टाळणे कठीण : यादव
By admin | Published: December 6, 2015 11:33 PM2015-12-06T23:33:06+5:302015-12-06T23:33:06+5:30
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बचावात्मक रणनीतीवर आश्चर्य व्यक्त केले.
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बचावात्मक रणनीतीवर आश्चर्य व्यक्त केले. केवळ बचावात्मक पवित्रा स्वीकारीत पाचव्या दिवशी पूर्णवेळ खेळणे शक्य नाही, असे यादव म्हणाला. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर यादव पत्रकार परिषदेत बोलत होता.
यादव म्हणाला,‘७२ षटकांत केवळ ७२ धावा फटकावल्यामुळे आश्चर्य वाटले. दक्षिण आफ्रिका संघ अशी कछवा छाप फलंदाजी करेल, याचा आम्ही विचार केला नव्हता. त्यांनी फटके खेळण्याचा प्रयत्न केला नाही, याचे आश्चर्य वाटले. फलंदाजांनी जर बचावात्मक पवित्रा स्वीकारला तर गोलंदाजांसाठी आव्हान ठरते.’
यादव पुढे म्हणाला,‘फलंदाज जर फटके खेळत नसतील तर गोलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. कारण त्यामुळे बाद करण्याच्या संधी कमी होतात. चांगला चेंडू टाकल्यानंतरही फलंदाज जर केवळ चेंडू थोपवत असेल तर त्याला बाद करणे कठीण होते. माझ्या मते, अशाप्रकारचे क्रिकेट कंटाळवाणे होते. कारण तुम्ही षटकानंतर षटके गोलंदाजी करीत असता, पण घडत काहीच नाही. आफ्रिका संघ अखेरच्या दिवशी दिवसभर बचावात्मक खेळून पराभव टाळू शकत नाही.’
यादव पुढे म्हणाला,‘हो, त्यांच्यावर दडपण आहे, त्यामुळे ते प्रत्येक चेंडू थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोमवारी सकाळी पहिल्या सत्रात त्यांना लवकर बाद करण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे. पूर्ण दिवसभर खेळून काढणे कठीण आहे. खेळपट्टीचे स्वरूपही बदलण्याची शक्यता आहे. आजही त्यांना नशिबाची साथ लाभली.’(वृत्तसंस्था)