दक्षिण आशियाई उपग्रह भारत ५ मे रोजी अंतराळात सोडणार
By admin | Published: May 1, 2017 03:57 AM2017-05-01T03:57:55+5:302017-05-01T03:57:55+5:30
द साऊथ आशिया सॅटेलाईट (जीसॅट-९) ५ मे रोजी अवकाशात सोडले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केले
नवी दिल्ली : द साऊथ आशिया सॅटेलाईट (जीसॅट-९) ५ मे रोजी अवकाशात सोडले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केले. भारताने त्याच्या शेजाऱ्यांना दिलेली ही ‘सब का साथ-सब का विकास’ या संकल्पनेचा भाग म्हणून मोठी भेट आहे, असे ते म्हणाले.
सार्कमधील आठपैकी सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने भारताकडून ही ‘भेट’ आम्हाला नको म्हणून त्यात भाग घ्यायला नकार दिला आहे. ‘आम्ही नेहमीच ‘सब का साथ, सब का विकास’ या संकल्पनेनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे मोदी त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
भारत ५ मे रोजी साऊथ आशिया सॅटेलाईट अवकाशात सोडेल. या उपग्रहाचे लाभ या प्रकल्पात सहभागी झालेल्या देशांना प्रदीर्घ काळपर्यंत विकासाच्या गरजा भागवताना मिळतील, असे त्यांनी सांगितले. भारताकडून ही ‘अमूल्य भेट’ असल्याचे वर्णन मोदी यांनी केले व हा प्रकल्प संपूर्ण दक्षिण आशियामध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे स्पष्ट केले. दक्षिण आशियाबाबत आम्ही दिलेल्या शब्दाचे अतिशय योग्य उदाहरण आहे. मोदी म्हणाले, हा उपग्रह दक्षिण आशियाला एकूण विकासाला मदत करील. हे फायदे नैसर्गिक स्रोत शोधण्याचे, टेली मेडिसीन, शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढवण्यात दिसतील.
या प्रकल्पाचा भाग बनलेल्या देशांचे (नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव व अफगाणिस्तान) मोदी यांनी आभार मानले. सुरुवातीला या उपग्रहाचे नाव ‘सार्क सॅटेलाईट’ होते; परंतु पाकिस्तानने प्रकल्पात भाग घ्यायला नकार दिल्यानंतर ते बदलून साऊथ आशिया सॅटेलाईट, असे करण्यात आले. उपग्रहाचा मुख्य उद्देश हा संपर्क आणि नैसर्गिक संकटात दक्षिण आशियात मदत, संपर्क असा आहे. हा उपग्रह आधी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सोडला जाणार होता. जीएसएलव्हीचा वापर करून हा उपग्रह अवकाशात सोडला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी जाहीर केले. संपूर्ण दक्षिण आशियायी देशांना केयू बँडद्वारे वेगवेगळ्या संपर्क अॅप्लिकेशन्स दिल्या जातील. या उपग्रहाचे वजन २,२३० किलो आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून त्याचे उड्डाण होईल.