अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; पाहा सुंदर फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:09 PM2022-06-01T12:09:51+5:302022-06-01T12:19:46+5:30
अयोध्येतील राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज मंदिराच्या गाभाऱ्याचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला.
नवी दिल्ली-
अयोध्येतील राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज मंदिराच्या गाभाऱ्याचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. यासोबतच योदी आदित्यनाथ आज द्राविडी शैलीत तयार करण्यात आलेल्या रामलला सदन मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. अयोध्येच्या रामकोट स्थित श्री राम जन्मभूमीपासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या दक्षिण भारतीय शैलीत तयार करण्यात आलेल्या या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव कलश यात्रेनं सुरू होणार आहे. अयोध्येतील हे पहिलं मंदिर असणार आहे की जिथं भगवान श्री रामाचे कुलदैवत भगवान विष्णू यांचे स्वरुप भगवान रंगनाथन यांचं मंदिर असणार आहे.
मंदिर कोणत्याही दाक्षिणात्य शहरात वसलेलं नसून ते अयोध्येत निर्माण करम्यात आलं आहे. दक्षिण भारतीय शैलीत तयार करण्यात आलेल्या या मंदिरात आज भगवान राम लक्ष्मण आणि सीतेची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतीय पद्धतीनं तयार करण्यात आलेलं हे अयोध्येतील एकमेव मंदिर ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील दक्षिण भारतीयांसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.
चेन्नईच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्टनं तयार केलं डिझाइन
समोर आलेल्या माहितीनुसार या मंदिराचं डिझाइन चेन्नईतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट स्वामीनाथन यांनी तयार केलं आहे. अयोध्येतील हे पहिलं वहिलं मंदिर ठरणार आहे की जे रामजन्म भूमीच्या अवघ्या काही पावलांच्या अंतरावर तयार करण्यात आलेलं दाक्षिणात्य शैलीतील मंदिर असणार आहे. दाक्षिणात्या स्थापत्य कलेचा नमुना या मंदिराच्या कलाकृतीतून पाहायला मिळतो.
भगवान राम, लक्ष्मण आणि त्यांच्या दोन भावांचं याच ठिकाणी बारसं झालं होतं अशी आख्यायिका आहे. म्हणूनच त्या जागेला रामलला सदन मंदिर नावानं ओळखलं जातं. विशेष म्हणजे या ठिकाणी श्री रामलल्ला, माता जानकी आणि लक्ष्मणाची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मूर्ती खास चेन्नईहून अयोध्येला आणण्यात आल्या आहेत. रामलल्ला सदन खूप प्राचीन स्थान आहे.