मोदींच्या दीप प्रज्वलनाला दक्षिणेत सर्वात कमी प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:04 AM2020-04-07T05:04:24+5:302020-04-07T05:04:41+5:30
पूर्व आणि ईशान्येतील राज्यांचा सर्वाधिक प्रतिसाद
संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी लोकांमध्ये भावनीक बळ निर्माण व्हावे या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाचे जेवढे कौतुक झाल तेवढी टीकाही झाली. मात्र, या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्याचे रविवारी स्पष्ट झाले. विशेष बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात कमी असलेल्या ईशान्य आणि पुर्वेतील राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल आहे. तर, सर्वात कमी प्रतिसाद दक्षिणेच्या राज्यांतील जनतेने दिल्याची महिती हाती आली आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पावर सिस्टीम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीओएसओसीओ) रविवारी देशभरात झालेल्या या मोहिमेची सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला आहे. त्यात दिलेल्या आकडेवारीची मांडणी केल्यानंतर हा निष्कर्ष हाती आला आहे. देशात वीज पुरवठा हा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि इशान्य असा पाच विभागांनुसार केला जातो. अहवालातील आकडेवारीनुसार रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात दक्षिणेतील राज्यांतली विजेची मागणी १७ टक्क्यांनी कमी झाली होती. ईशान्येत हे प्रमाण ४० टक्के तर पुर्वेतील राज्यांमध्ये ३५ टक्के होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरेत २६ टक्के तर पश्चिमेतील राज्यांमध्ये विजेची मागणी २४ टक्क्यांनी कमी झाली होती.
रविवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी देशातील विजेची मागणी १ लाख १६ हजार ८८७ मेगावॅट होती. लोकांनी दिवे बंद करायला सुरूवात केल्यानंतर ती मागणी ८५ हजार ७९९ मेगावॅटपर्यंत कमी झाली होती. ही घट ३१ हजार ८९ मेगावॅटची होती.
पीओएसओसीकडून इव्हेंट असा उल्लेख
देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधानांची इव्हेंट करण्याची हौस भागत नाही अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे पीओएसओसीकडून प्रसिध्द केलेल्या अहवालातही या आवाहनाचा उल्लेख इव्हेंट असा करण्यात आला आहे.