लोकसभेची पेरणी! नितीशकुमार 94 लाख कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार; कॅबिनेटमध्ये निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:24 PM2024-01-17T16:24:03+5:302024-01-17T16:24:17+5:30
बिहार सरकार गरीब कुटुंबांसाठी स्वयंरोजगार योजना घेऊन आली आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दोन दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
इंडिया आघाडीची मोट बांधून पंतप्रधान पदाची आस लावून बसलेल्या नितीशकुमारांनी लोकसभा निवडणुकीची पेरणी सुरु केली आहे. बिहारमधील ९४ लाखांहून अधिक कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार असल्याची घोषणा आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत करून टाकली आहे. बैठकीत यावर निर्णय झाला आहे. या योजनेसाठी १२५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय निधीला मंजुरीही देऊन टाकली आहे.
बिहार सरकार गरीब कुटुंबांसाठी स्वयंरोजगार योजना घेऊन आली आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दोन दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान तीन टप्प्यांत दिले जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ निर्णय घेण्यात आले आहेत.
काही काळापूर्वी नितीशकुमारांनी जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती. या आधारे ज्यांचे महिन्याला ६ हजारांच्या आत उत्पन्न आहे त्या कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. अशी 94 लाख 33 हजार 312 गरीब कुटुंबे आहेत. या कुटुंबातील कमीतकमी एका व्यक्तीला दोन लाख रुपयांचे अनुदान पुढील पाच वर्षांत द्यायची ही योजना नितीशकुमार सरकारने बनविली आहे.
अनुदानाच्या पैशातून स्वयंरोजगारासाठी 62 उद्योगांची यादीही तयार करण्यात आली आहे. लाकूड-आधारित उद्योग, बांधकाम उद्योग, हस्तकला, कापड, अन्न प्रक्रिया इत्यादींचा यात समावेश आहे. याशिवाय सलून, इलेक्ट्रॉनिक्स, लॉन्ड्री, दैनंदिन वापराच्या गरजा यासारख्या सेवा क्षेत्रांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.