सपाच्या उमेदवार दीक्षितांचा प्रवास इंग्लंड- दुबई-फतेहाबाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:48 AM2022-01-25T06:48:32+5:302022-01-25T06:48:51+5:30
वडील, भाऊ व कुटुंबातील तिघे भोगताहेत जन्मठेप
लखनौ : समाजवादी पार्टीच्या फतेहाबाद विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रूपाली दीक्षित (३४) यांचे वडील, भाऊ आणि कुटुंबातील इतर तिघे खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. रूपाली दीक्षित यांनी इंग्लंडमध्ये पदव्युत्तर आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आणि दुबईत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीही केली. २०१६ मध्ये त्या आग्राला परतल्या. त्याचे कारण होते त्यांचे वडील अशोक दीक्षित आणि कुटुंबातील इतर ४ जणांना एका खून खटल्यात सुनावली गेलेली जन्मठेपेची शिक्षा. रूपाली दीक्षित यांच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्य तुरुंगात असल्यामुळे त्यांनी त्या खटल्याचा अभ्यास सुरू केला. कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर रूपाली दीक्षित यांनी आग्रा विद्यापीठात विधि शाखेत प्रवेश घेऊन पदवी मिळविली.
या दरम्यान, त्यांनी स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांशीही संपर्क वाढविला. अशोक दीक्षित आणि रूपाली यांचा भाऊ अजय हे सध्या तुरुंगात असून, इतर सदस्यांना जामीन मिळाला आहे. २०१७ मध्ये रूपाली दीक्षित यांनी फतेहाबादमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जितेंद्र वर्मा यांच्यासाठी प्रचार केला व ते ३४ हजार मतांनी निवडून आले.