सपा-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी!
By admin | Published: January 22, 2017 12:42 AM2017-01-22T00:42:52+5:302017-01-22T00:42:52+5:30
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे.
- मीना कमल, लखनौ
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे. मात्र काँग्रेसला ९0 जागाच द्यायला अखिलेश यादव तयार आहेत.
त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी उद्या, रविवारी जाहीर करणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती देताना सांगितले की, आघाडी होणार की नाही, हे तुम्हाला उद्याच कळेल. अर्थात दोघेही ताणून धरत असले तरी आघाडी दोघांना हवी असल्याचे सध्याचे चित्र आहे.
काँग्रेसचा १२0 जागांचा आग्रह जसा कायम आहे, तसेच काही मतदारसंघांसाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधील सर्व विधानसभा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जजाहीर केले आहेत. तिथे सपाचेच उमेदवार गेल्या वेळी विजयी झाले होते. त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तसेच सपाच्या नेत्या अपर्णा यादव या जेथून निवडून आल्या, त्या जागेवरही काँग्रेस आग्रही आहे आणि ती मिळणार नाही, असे सपाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे सपाच्या मेहरबानीवर आपण राहू नये, त्यापेक्षा सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला २८ जागांवरच विजय मिळाला. मात्र पक्षाला ११.९ टक्के मते मिळाली होती. सपाशी आघाडी केल्याने ५ ते ८ टक्के मते वाढली, तरी आपल्या आमदारांची संख्या ६0 पर्यंत जाईल, असे काँग्रैसला वाटत आहे.
काँग्रेसला जास्त जागा देता नयेत, असे सपा नेते जाहीरपणे म्हणत असले तरी त्या पक्षाच्या मतांवर सपाचीही भिस्त आहे. काँग्रेसची १0 ते ११ टक्के मते आपल्याला सत्तेपर्यंत नेतील, असे समाजवादी पक्षाचे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. एकीकडे भाजपा आणि दुसरीकडे बसपा यांना आजच्या स्थितीत तोंड देण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यायला हवे, असा मतप्रवास अखिलेश गटामध्ये आहे.
मायावती यांची टीका
अखिलेशना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारून काँग्रेसने समाजवादी पार्टीपुढे लोटांगण घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. काँग्रेस आणि सपात युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बसपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल, तर त्याने सपासोबत जाऊ नये, असा माझा त्या पक्षाला सल्ला आहे. आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकतर एकट्याने निवडणूक लढवावी किंवा छोट्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करावी, असे मायावती म्हणाल्या. त्यांच्या पत्तकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांचे सहकारी अंबिका चौधरी यांनी बसपात प्रवेश केला.