सपाची भाजपा आणि काँग्रेसवर टीका
By Admin | Published: July 14, 2016 03:23 AM2016-07-14T03:23:50+5:302016-07-14T03:23:50+5:30
उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून समाजवादी पार्टीने भाजपा आणि काँग्रेसवर बुधवारी सडकून टीका केली. भाजपाने मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा
लखनौ : उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून समाजवादी पार्टीने भाजपा आणि काँग्रेसवर बुधवारी सडकून टीका केली. भाजपाने मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा, तर काँग्रेसने द्वेषमूलक भाषण करणाऱ्या इम्रान मसूद यांना पदे
दिली असून, निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतील निराशा वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे सपाने म्हटले आहे.
भाजपाने मंगळवारी १५ उपाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात वादग्रस्त आमदार राणा यांचाही समावेश आहे. २०१३च्या मुझफ्फरनगर दंगलीत जमावाला चिथावल्याबद्दल त्यांना रासुका लावून तुरुंगात पाठविण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मसूद यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध द्वेषमूलक भाषण केले होते. काँग्रेसने त्यांची पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मसूद यांनी आपण मोदींचे तुकडे तुकडे करू, असे म्हटले होते.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना सुरेश राणा आणि इम्रान मसूद यांच्या निवडीबाबत छेडले असता, ते म्हणाले की, ‘या मागे राज्यातील वातावरण बिघडविण्याच्या मोठा कट आहे. मात्र, मतदारांना वस्तुस्थिती ठाऊक असून, ते जोरदार प्रत्युत्तर देतील.’ (वृत्तसंस्था)