सपाचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन सपोर्टवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 01:07 PM2021-05-29T13:07:41+5:302021-05-29T13:14:01+5:30
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांच्या फुफुस्सामध्ये संक्रमण वाढीस लागल्याने त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना इतर वार्डमध्ये ठेवण्यात आले होते.
लखनौ - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (Azam Khan) यांना सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता आझम खान यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाली आहे. त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांच्या फुफुस्सामध्ये संक्रमण वाढीस लागल्याने त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना इतर वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा त्यांच्या प्रकृती खालवली असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मेदांता रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर टीमने आझम खान यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कोविड आयसीयूमध्ये शिफ्ट केलं आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. दरम्यान, आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह यालाही कोरोनाची लागण झाली होती, ते उपचार घेऊन बरे झाले आहेत.
तुरुंगातून थेट मेदांता रुग्णालयात
आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. आझम खान आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात ते कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खान यांच्यासोबतच तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं.