मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याने केलं अपहरणकर्त्याच्या आई-वडिलांचं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 11:33 AM2017-07-31T11:33:36+5:302017-07-31T11:36:55+5:30
अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे
भोपाळ, दि. 31 - आपल्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत एखाद्याचं अपहरण झालं असेल तर कुटुंब खंडणीची रक्कम देऊन सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण ऐकंल किंवा पाहिलं असेल. जास्तीत जास्त पोलिसांकडे जाऊन मदत मागून अपहरकर्त्याला बेड्या ठोकल्याचंही वाचलं असेल. पण अपहरणकर्त्याच्या कुटुंबाचं अपहरण केल्याचं कधी पाहिलं आहे का ? नसेलच...पण मध्यप्रदेशमधील सटाणा जिल्ह्यात हे पाहायला मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दरोडेखोराने समाजवादी पक्षातील नेत्याच्या मुलाचं अपहरण करत खंडणीची मागणी केली. अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याच्या नातेवाईकांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण करुन टाकलं.
समाजवादी पक्षाचे नेते संतू सिंह यांच्या मुलाचं दरोडेखोर बबली कोल याने अपहरण केलं आहे. मात्र संतू सिंह यांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनीदेखील हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. मात्र स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, बबली कोलच्या आई-वडिलांना संतू सिंह यांनी ताब्यात ठेवलं असून मुलाची सुटका करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
टाईम्स ऑप इंडियाने संतू सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'मी दरोडेखोर, प्रशासन आणि पोलीस सर्वांनाच 24 तासांची वेळ दिली आहे'. मिळालेल्या माहितीनुसार बबली कोलने संतू सिंह यांचा मुलगा विजयची सुटका करण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली आहे.
विजयचं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरुन अपहरण करण्यात आलं होतं. संतू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विजय आपल्या मित्रांसोबत उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमातून घऱी परतत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 30 जुलै रोजी हे अपहरण झालं'.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या खंडणीवरुन दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाची सुखरुप सुटका झाल्यास आई-वडिलांनाही सुखरुप सोडण्यात येईल असं आश्वासन दरोडेखोराला देण्यात आलं आहे.