Loksabha Elections by polls: "कुठेही भांडण होत असेल तर मिटवायला अजिबात जाऊ नका, नाहीतर..."; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:33 PM2022-11-30T16:33:34+5:302022-11-30T16:34:33+5:30
"अरेरावी, गुंडगिरी करू नका. कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली तरी सहन करा, पण..."
Loksabha Elections By Polls: लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या शिवपाल यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खास सल्ला दिला. मैनपुरी येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला. "कुठेही भांडण होत असेल तर भांडण मिटवायला जाऊ नका, कारण त्यात अडकलात तर तुरुंगात जाल, एवढेच नाही तर पोलिसांनी बोलावले तरी जाऊ नका, पोलिसांच्या तावडीत सापडू नका, असे शिवपाल यांनी सांगितले.
"आमची लढाई भाजपशी नाही, तर संपूर्ण सरकारशी आहे. प्रशासन आणि अधिकाऱ्यांशीही आम्हाला लढा द्यायचा आहे. कार्यकर्त्यांनो, कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा गुंडगिरी करू नका. कार्यकर्त्यांना कोणी शिवीगाळ केली तरी सहन करा, पण पोलिसांच्या हाती लागू नका," असे आवाहन शिवपाल सिंग यांनी केले. तसेच, "भांडण झाले तर सोडवायला जाऊ नका, नाही तर तुम्हाला तुरुंगात डांबून ठेवले जाईल," असेही शिवपाल म्हणाले.
एवढेच नाही तर शिवपाल यादव यांनी जाहीर सभेत अखिलेश यादव यांना नवे नाव दिले. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मुलायम सिंह यादव यांना नेताजी म्हणायचे. तसेच आजपासून अखिलेश यादव यांना छोटे नेताजी या नावाने हाक मारली जाणार आहे. या दरम्यान शिवपाल यादव यांनी भाजपचे मैनपुरीचे उमेदवार रघुराज शाक्य यांची तुलना बैलगाडीखाली फिरणाऱ्या कुत्र्याशी केली. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर मैनपुरी लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या जागेवरून सपाने डिंपल यादव यांना तिकीट दिले आहे. तर भाजपाने रघुराज शाक्य यांना तिकीट दिले आहे.
एसपींनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार-
मैनपुरी आणि रामपूर पोटनिवडणुकीबाबत समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सपाने सरकारी यंत्रणेवर भेदभाव आणि पक्षपाताचा आरोप केला आहे. पक्षाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाकडे निष्पक्ष निवडणुकांचे आवाहन केले. यापूर्वी, सपाने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता.