सपा नेत्याचे ‘बुथ कॅप्चरिंग’ कॅमेराबंद!
By admin | Published: October 18, 2015 02:11 AM2015-10-18T02:11:31+5:302015-10-18T02:11:31+5:30
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान मैनपुरीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सत्ताधारी पार्टीचे ज्येष्ठ नेते तोताराम यादव यांनी मतदान केंद्रावर ताबा
लखनौ : उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान मैनपुरीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सत्ताधारी पार्टीचे ज्येष्ठ नेते तोताराम यादव यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवीत स्वत:च मतपत्रिकांवर ठप्पे मारल्याचे चित्रीकरणातून उघडकीस आल्याने सरकारसोबतच निवडणूक यंत्रणेचेही वाभाडे निघाले आहे.
या प्रकरणी प्रोसेसिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन को-आॅपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेडचे (पॅकफेड) अध्यक्ष असलेले तोताराम यादव यांच्यासह १५ जणांविरुद्ध मैनपुरीच्या बेवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मैनपुरीचे जिल्हाधिकारी सी.पी. सिंग यांनी सांगितले की, गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांमध्ये सात पोलीस आणि मतदान केंद्रावरील चार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे अपर निवडणूक आयुक्त जे.पी. सिंग यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर मैनपुरीच्या रायपूर मतदान केंद्रावर फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. बुथ कॅप्चरिंगची तक्रार मिळाल्यानंतर गृहसचिव व मैनपुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
व्हिडिओ बनावट : तोताराम यांचा दावा
- दुसरीकडे तोताराम यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून, हे विरोधकांचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्हायरल झालेला व्हिडिओसुद्धा बनावट असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, तोताराम यांना राज्यमंत्र्याचा दर्जा नसून ते केवळ पॅकफेडचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल.