बंगले रिकामे करायला हवा सपा नेत्यांना पुरेसा अवधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:14 AM2018-05-29T05:14:51+5:302018-05-29T05:14:51+5:30
सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी बळकावलेले सरकारी बंगले रिकामे करून घेण्यात यावेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने संबंधितांना नोटिसा पाठविल्यानंतर
नवी दिल्ली : सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी बळकावलेले सरकारी बंगले रिकामे करून घेण्यात यावेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने संबंधितांना नोटिसा पाठविल्यानंतर, मुलायमसिंग यादव व अखिलेश यादव यांनी त्यासाठी पुरेसा अवधी मागितला आहे. तशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
मुलायमसिंग व त्यांचे पुत्र अखिलेश यांच्याखेरीज अन्य माजी मुख्यमंत्र्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत. या दोघांनी मात्र या आधी आम्हाला यासाठी दोन वर्षांचा अवधी मिळावा, अशी विनंती केली होती. आता अर्जात त्यांनी केवळ पुरेसा अवधी मिळावा, असे म्हटले आहे.
लखनौमध्ये स्वत:चे घर नसल्याने राहण्याची पर्यायी जागा शोधत असल्याचे अखिलेश गेल्या आठवड्यात म्हणाले होते. मुलायमसिंग यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना आपला व अखिलेश यांचा बंगला द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. हे दोन्ही नेते समाजवादी पक्षाचे आमदार
आहेत. त्यांना ते बंगले मिळाले, तर तिथे आपणा दोघांना राहणे शक्य होईल, असा मुलायमसिंग यांचा अंदाज होता. मात्र, हे दोन्ही बंगले रिकामे होईपर्यंत ते कोणाला द्यायचे, याचा निर्णय घेणे शक्य नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना सांगितले होते.