Pushpraj Jain IT Raid: सपा आमदार पुष्पराज जैन आयकर विभागाच्या ताब्यात; अद्याप धाडसत्र सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:27 PM2022-01-03T13:27:21+5:302022-01-03T13:28:27+5:30
Pushpraj Jain IT Raid : सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी आणि पुष्पराज जैन यांच्या घरी पोहोचले. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना सोबत घेऊन जाताना दिसले.
कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन (Pushpraj Jain Detained)उर्फ पंपी जैन यांना आयकर विभागाने ताब्यात घेतले आहे. आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना त्यांच्यासोबत कन्नौजहून कानपूरला घेऊन गेले. यासोबतच पथक अनेक बॅगमध्ये कागदपत्रे घेऊन जाताना दिसले.
आयकर विभागाने (Income Tax) पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणांवर धाड (Raid) टाकली आहे. जवळपास 72 तासांहून अधिक काळ हे धाडसत्र सुरु आहे. सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी आणि पुष्पराज जैन यांच्या घरी पोहोचले. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना सोबत घेऊन जाताना दिसले. कनौज येथील पुष्पराज जैन यांच्या घरी आणि कारखान्यात अजूनही पोलीस उपस्थित असल्याची माहिती आहे.
कोण आहेत पुष्पराज जैन?
2016 मध्ये पुष्पराज जैन इटावा-फर्रुखाबाद येथून विधान परिषदेवर निवडून आले. ते प्रगती अरोमा ऑइल डिस्टिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मालक आहेत. 1950 मध्ये त्यांचे वडील सावलाल जैन यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला होता. पुष्पराज जैन आणि त्यांचे तीन भाऊ कन्नौजमध्ये व्यवसाय करतात आणि एकाच घरात राहतात. पुष्पराज जैन यांचे मुंबईतही घर आणि कार्यालय आहे, तेथून ते मुख्यतः मध्य पूर्वेतील जवळपास 12 देशांमध्ये निर्यातीचे व्यवहार करतात. त्यांच्या तीन भावांपैकी दोन भाऊ मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करतात तर तिसरा त्याच्यासोबत कन्नौजमध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग सेटअपवर काम करतो.
पुष्पराज जैन यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
2016 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पुष्पराज जैन आणि त्यांच्या कुटुंबाकडे 37.15 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 10.10 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्यांनी कन्नौजमधील स्वरुप नारायण इंटरमीडिएट कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शुक्रवारी छापे सुरू झाल्यानंतर पुष्पराज यांनी पीयूष जैन यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले होते.